अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 11:37 IST2025-10-16T11:36:25+5:302025-10-16T11:37:01+5:30
'ती सध्या काय करते'च्या सीक्वेलबद्दल दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले...

अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...
अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधानचा 'ती सध्या काय करते' हा सिनेमा मराठी प्रेक्षकांच्या फार जवळचा आहे. सिनेमाचं टायटल, यातली गाणी, कथा सगळंच लोकांना भावणारं होतं. २०१७ साली हा सिनेमा आला होता. आर्या आंबेकर आणि अभिनय बेर्डेचा हा पहिला सिनेमा होता. सिनेमा रिलीज होऊन आता ८ वर्ष झाली आहेत. दरम्यान सिनेमाच्या सीक्वेलची सध्या चर्चा सुरु झाली आहे. दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी नुकतंच या चर्चांवर प्रतिक्रिया दिली.
'नवशक्ती'ला दिलेल्या मुलाखतीत सतीश राजवाडे म्हणाले, "सिनेमाचा पुढचा भाग करायला खूप आवडेल. कारण तो चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला होता. तो सिनेमा प्रत्येकाच्या मनातला आहे. खरं तर 'ती सध्या काय करते' हे टायटल प्रत्येक मुलाच्या मनातलं आहे. त्यामुळे आता कसा वेळ मिळतो त्यावर अवलंबून आहे. पण नक्कीच याचा सीक्वेल करुया."
सतीश राजवाडे यांचा आणखी एक गाजलेला सिनेमा म्हणजे 'प्रेमाची गोष्ट'. २०१३ साली हा सिनेमा आला होता. १२ वर्षांनी आता त्याचा सीक्वेल आला आहे. 'प्रेमाची गोष्ट २'मध्ये ललित प्रभाकर, ऋचा वैद्य आणि रिद्धिमा पंडित मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत सतीश राजवाडेंनी 'ती सध्या काय करते'चा सीक्वेलही करु अशी घोषणा केली आहे.
सतीश राजवाडेंनी 'मुंबई पुणे मुंबई', 'आपला माणूस', 'ऑटोग्राफ', 'ती सध्या काय करते', 'बदाम राणी गुलाम चोर', 'एक डाव धोबीपछाड' असे एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.