संतोष जुवेकरने लिहिलाय 'छावा' सिनेमातला 'तो' जबरदस्त डायलॉग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 11:59 IST2025-03-03T11:59:27+5:302025-03-03T11:59:56+5:30
'छावा'मधील एक डायलॉग संतोषनं लिहलेला आहे.

संतोष जुवेकरने लिहिलाय 'छावा' सिनेमातला 'तो' जबरदस्त डायलॉग
Santosh Juvekar: छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा 'छावा' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा उत्तम प्रयत्न दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी केला आहे. १४ फेब्रुवारी रोजी 'छावा' सिनेमा प्रदर्शित झाला आणि सर्व चित्रपटगृह हाऊसफुल झाले. अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी दमदार भूमिका साकरली. तर विकीने महाराजांची साकारलेल्या भूमिकेने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं. या सिनेमात काही मराठी कलाकारही झळकले. अभिनेता संतोष जुवेकरने 'छावा'मध्ये रायाजी हे पात्र साकारले आहे. संतोषच्या भूमिकेचं देखील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या सिनेमातील काही डायलॉगही गाजले आहेत. 'छावा'मधील एक डायलॉग संतोषनं लिहलेला आहे.
संतोषनं सिनेमात फक्त अभिनय केला नाहीये तर त्याच्या तोंडी असलेला एक डायलॉग प्रेक्षकांच्या हृदयाला भिडला आहे. तो डायलॉग लेखकानं नाही तर खुद्द संतोषनं लिहलाय. न्यूज१८ लोकमतशी बोलताना संतोष म्हणाला, "लक्ष्मण सरांनी आम्हाला स्क्रिप्ट वाचताना सांगितलं होतं, की एखाद्या सीनमध्ये तुम्हाला जर वाटत असेल की इथे हे वाक्य रायाजी बोलू शकतो तर मला सांगा. तर चित्रपटात जो सीन आहे, तर मी अनेकदा त्यांना काही वाक्य सुचवायचो. पण, ते त्यांना पटत नव्हते".
"सिनेमात जो सीन आहे, जेव्हा महाराजांच्या मानेवर धाराऊ यांना घाव दिसतो. तेव्हा त्या म्हणतात, "ये क्या युवराज फिर से नजर उतारनी पडेगी". त्यावेळेस मी सरांना म्हणालो की सर मला हे "अगं आऊ.... अख्ख्या स्वराज्याची नजर ज्याच्यावर आहे त्याला कोणाची नजर लागणार" हे एक सुचलंय. तर लक्ष्मण उतेकरांना ते वाक्य आवडलं आणि मला हे हिंदीत भाषांतरित करायला सांगितलं. तर मग त्यांना "अगं आऊ..." हे मराठीत घेऊ का विचारलं तर ते हो म्हणाले. मग "अगं आऊ.... पूरे स्वराज्य की नजर जिसपर है, उसे क्या किसी की बुरी नजर लगेगी" असं वाक्य मी सीनमध्ये घेतलं".
लक्ष्मण उतेकर यांच्या कामाचं कौतुक करत संतोषने म्हटलं, "कलाकाराला अशा प्रकारची सूट देणं हे कलाकाराला त्या संहितेच्या प्रक्रियेत किंवा निर्मिती प्रक्रियेत सामावून घेण्यासारखं आहे". 'छावा' या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्सने केली आहे. या चित्रपटात दिव्या दत्ता, आशुतोष राणा आणि अक्षय खन्ना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.