"मराठी सिनेमाला थिएटर मिळत नसतील तर.."; सुबोध भावेने सांगितला महत्वाचा उपाय, म्हणाला-
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 13:39 IST2025-01-03T13:38:45+5:302025-01-03T13:39:08+5:30
सुबोध भावेने अत्यंत स्पष्ट आणि रोखठोकपणे मराठी सिनेमांना थिएटर मिळत नसतील तर काय केलं पाहिजे, हे सांगितलं आहे (subodh bhave)

"मराठी सिनेमाला थिएटर मिळत नसतील तर.."; सुबोध भावेने सांगितला महत्वाचा उपाय, म्हणाला-
संगीत मानापमान निमित्ताने सध्या सुबोध भावे चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात सुबोध भावे धैर्यधर ही भूमिका साकारणार आहे. सध्या अनेक मराठी सिनेमांना महाराष्ट्रात थिएटर्स मिळत नाहीयेत. त्यानिमित्ताने सुबोध भावेने अमोल परचुरेंच्या कॅचअप चॅनलला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सविस्तर त्याचं मत मांडलं. सुबोध म्हणाला की, "ही गोष्ट कलेक्टिव्ह करण्याची गोष्ट आहे. तक्रार करण्यापेक्षा नवीन रस्ता निर्माण केला पाहिजे असं मला कायम वाटतं. मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीत अशी खूप बोंबाबोंब आपण करतो मराठी चित्रपटाचे घटक म्हणून आपण काय प्रयत्न केले?"
"मराठी चित्रपट ही काही सुबोध भावेची खाजगी मालमत्ता नाहीये. किंवा माझ्या आजूबाजूला काम करणाऱ्या लोकांची खाजगी मालमत्ता नाहीये. आपल्या सगळ्यांची मिळून असलेली ही एक संस्था आहे. या संस्थेचे तुम्ही घटक आहात तसा मीही एक घटक आहे. जर आपल्याला पाहिजे तसे थिएटर नाही मिळत आहेत, पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाहीये, तर किती दिवस आपण रडत बसणार. की त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष ग्राउंडवरती उतरुन काम करणार?"
"माझा मार्केटिंगचा स्वभाव सांगतो की, प्रत्यक्ष ग्राऊंडवरती उतरुन काम केलं पाहिजे. माझ्यातला एक पुणेरी, अभिमानी, बंडखोर व्यक्ती सांगतो की, तेल लावत गेले मल्टिप्लेक्स आम्हाला नाही रिलीज करायचाय तुमच्याकडे. मग काय करायचं? नळाला पाणी येत नाहीये तर नळाला पाणी येईल याची वाट बघत बसायचीये. की पाण्याचा शोध घ्यायचाय आपल्याला. तर पाण्याचा शोध घ्यायचाय.. कारण तहान लागलीये आपल्याला. मग आपण पुण्या-मुंबईपुरते किती दिवस मर्यादित राहणार आहोत. पुण्या-मुंबईच्या पलीकडे नंदूरबार, लातूर, अंमळनेर इतके प्रदेश महाराष्ट्रात आहेत. त्याठिकाणीही मराठी प्रेक्षक आहेत. तर आपण त्यांच्यापर्यंत कधी पोहोचणार आहोत."
"जर थिएटरमध्ये आपला सिनेमा लागत असेल तर त्याची पर्यायी व्यवस्था आपण निर्माण करणार आहोत की नाही? ही फक्त सुबोध भावेने करण्यासारखी गोष्ट नाहीये. ही गोष्ट जेव्हा सर्व एकत्र येऊन मंथन होईल तेव्हा घडेल. आम्ही हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा पहिला शो नाट्यगृहात केला. महाराष्ट्रात असं एकही शहर नाहीये जिथे नाट्यगृह नाही. त्या शहरांमधील नाट्यगृहांमध्ये प्रयोग होत नसल्याने ही नाट्यगृह नुसती पडून असतात. तिथे जाऊन नाट्यगृहात जर शो लावला तर तिथे लोक यायला निघतील. नाट्यगृहांचा खर्च निघेल."
"नाट्यगृह सांभाळणं ही मोठी गोष्ट नाही. पांढरा हत्ती आहे तो. नाटकाचे प्रयोग असेल तेव्हा शो होणार नाही. नाटकाच्या पोटावर पाय देऊन आम्हाला काही करायचं नाहीये. पहिलं प्राधान्य स्टेज शोला असेल. आपल्याला महाराष्ट्रात अशा कोणत्या जागा आहेत जिथे सिनेमांचे शो होऊ शकतात हे शोधलं पाहिजे. मल्टिप्लेक्सला समांतर यंत्रणा जोवर आपण उभी करत नाही तोवर आपण पुढे जाणार नाही. किती दिवस आपण रडत बसणार थिएटर नाही म्हणून. आपली एक मोठी यंत्रणा उभी केली पाहिजे आणि ते एकटा सुबोध भावे नाही करु शकत." अशाप्रकारे सुबोध भावेने त्याचं मत मांडलंय. सुबोधचा 'संगीत मानापमान' सिनेमा १० जानेवारीला रिलीज होतोय.