३ वर्ष लग्न लपवून ठेवलं, घरच्यांना व्हॉट्सअपवर सांगून दिला धक्का! 'अशी' आहे 'सैराट'मधील 'सल्या'ची लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 11:20 IST2026-05-13T11:19:33+5:302026-05-13T11:20:14+5:30
"भावाला कळलं म्हणून शेतात जाऊन लपलो...", 'सैराट'सारखीच आहे 'सल्या'ची लव्हस्टोरी, म्हणाला-"कोर्ट मॅरेज केलं आणि…"

३ वर्ष लग्न लपवून ठेवलं, घरच्यांना व्हॉट्सअपवर सांगून दिला धक्का! 'अशी' आहे 'सैराट'मधील 'सल्या'ची लव्हस्टोरी
Sairat Fame Arbaj Shaikh Love Story: नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा २०१६ साली प्रदर्शित झालेला सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमातील कलाकारांचा अभिनय, त्यातील गाणी, संवाद या सगळ्या गोष्टींचं कौतुक झालं. तसेच सिनेमातील आर्ची आणि परशा प्रमाणेच सल्याची भूमिका देखील लोकप्रिय झाली होती. सैराटमध्ये सल्याची भूमिका साकारणारा अरबाज शेख मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. अलिकडेच अभिनेता अरबाज शेखने सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. लग्नाचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. अरबाजने वैयक्तिक आयुष्यात गर्लफ्रेंड सिमरनसोबत संसार थाटला. मात्र, त्याने ३ वर्षांपूर्वीच लग्न केलं होतं.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अरबाजने याबाबत खुलासा केला आहे.
अरबाज आणि सिमरन एकाच शाळेत शिकायला होते. ४ थी मध्ये असतानाच अरबाजला सिमरन आवडत होती. मात्र, त्यानंतर सिमरन पुण्याला शिकायला गेली. त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला. नुकत्याच 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत अरबाजने त्यांच्या प्रेमकहाणीविषयी सांगितलं. तो म्हणाला, “आम्ही चौथीपर्यंत एकत्र जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होते. ती लहानपणापासून मला आवडायची. मग पाचवीत असताना ती पुण्याला आली. पुण्याला शिफ्ट झाल्यामुळे आमचा एकमेकांशी काहीच संपर्क नव्हता. मग दहावीत असताना तिला एक मेसेज केलास तिच्या भावाच्या मोबाईलवरून मी तिचा नंबर मिळवला होता. त्या नंबरवर मी तिला शायरी पाठवली होती.पण सिमरनने तो मेसेज तिच्या मोठ्या भावाला दाखवला. त्यानंतर मग हिचा भाऊ मला ओरडला. तेव्हा मी खूप घाबरलो होतो आणि गावाच्या बाहेर दूर शेतात जाऊन लपून बसलो होतो."
मग पुढे अरबाज म्हणाला,"मग काही दिवसांनी ‘सैराट’ चित्रपट आला. सिमरनने सिनेमा पाहिला की नाही मला काहीच माहीत नव्हतं. पण,माझ्याकडे तिचा नंबर सेव्ह होता.मग एके दिवशी रात्री मी पुन्हा तिला मेसेज केला. मग हळुहळू आमचं छान बोलणं सुरू झालं, हळूहळू गोष्टी घडू लागल्या. मग नंतर आम्ही भेटलो आणि हा प्रवास इथपर्यंत पोहोचला."
सिमरन काय म्हणाली?
या मुलाखतीत सिमरनने म्हटलं,"त्यावेळेस मला काहीचं माहित नव्हतं की, याच्या मनात असं काही आहे. ९ ऑक्टोबर २०१९ मध्ये आम्ही एका कॅफेमध्ये भेटलो. लॉकडाउनच्या काळात आमच्यात बोलणं सुरु झालं होतं. त्यावेळी माझ्या वाढदिवशी त्याने मला प्रपोज केलं. त्यानंतर दोन वर्षांनी मी त्याला होकार दिला."
लग्नाविषयी अरबाज म्हणाला, "आम्ही एक-दीड वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो तेव्हा मग आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. पण, हिच्या घरच्यांकडून लग्नाला विरोध होता. मग आम्ही अचानक एक दिवस आम्ही ठरवलं की आता लग्न करायचं. आम्ही कोर्ट मॅरेज केलं आणि आठ दिवसांनी घरच्यांना सगळ्यांना व्हॉट्सअपवर मेसेज करून सांगितलं, त्यांना फोटो पाठवला होता.” अरबाज आणि सिमरनने तीन वर्ष आपलं लग्न लपवून ठेवलं होतं, असा खुलासाही त्यांनी मुलाखतीत केला.