'अशी ही बनवाबनवी'च्या सेटवर सचिन पिळगावकरांनी लक्ष्मीकांत बेर्डेंना लगावलेले खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 16:18 IST2025-08-02T16:17:06+5:302025-08-02T16:18:15+5:30
Ashi Hi Banwa Banwi Movie : सचिन पिळगावकर दिग्दर्शित हा सिनेमा मराठीतील क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. हा सिनेमा आजही तितक्याच आवडीने पाहिला जातो. या चित्रपटातील सर्वच डायलॉगने प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

'अशी ही बनवाबनवी'च्या सेटवर सचिन पिळगावकरांनी लक्ष्मीकांत बेर्डेंना लगावलेले खडेबोल
दिग्दर्शक सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांचे चित्रपट आजही पाहिले की ते आपल्याला खळखळून हसवतात. सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या त्रिकूटाने मराठी चित्रपटसृष्टीला एक सुवर्णकाळ दाखवला आहे. या तिघांचा असाच एक अजरामर सिनेमा म्हणजे 'अशी ही बनवाबनवी' (Ashi Hi Banva Banvi Movie). सचिन पिळगावकर दिग्दर्शित हा सिनेमा मराठीतील क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. हा सिनेमा आजही तितक्याच आवडीने पाहिला जातो. या चित्रपटातील सर्वच डायलॉगने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. एका मुलाखतीत सचिन पिळगावकर यांनी या सिनेमातील लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचा किस्सा सांगितला.
सचिन पिळगावकर यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अशी ही बनवाबनवीचा किस्सा सांगितला. त्यांनी सांगितलं की, ''अशी ही बनवाबनवी या चित्रपटात शेवटी एक सीन आहे. ज्यात सुधा म्हणजेच मी स्ट्रेचरवर झोपलेला असतो आणि बाजूला पार्वती म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे उभे असतात. लक्ष्मीकांतला हाक मारण्यासाठी जेव्हा मी जाऊ बाई म्हणतो तेव्हा पंच म्हणून लक्ष्या नका बाई इतक्यात जाऊ असं म्हणतो. हा सीन प्रचंड गाजला होता. खरंतर नका बाई इतक्यात जाऊ हा डायलॉग लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सहज डोक्यात आला होता आणि त्यांनी तो म्हणून दाखवला. मात्र सुरुवातीला हा डायलॉग सिनेमात नव्हता.''
''त्या डायलॉगने थिएटरमध्ये गोंधळ घातला''
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सचिन यांना हा डायलॉग बोलू द्या अशी विनंती केली होती. त्यावर सचिन पिळगावकर म्हणाले की, ''मला तो सतत विनंती करायचा. कारण मी त्याला हलायला द्यायचो नाही. जे सांगितलं तेवढंच करायचं. याच्या बाहेर जायचं नाही, औकातीत राहायचे. असे मी नेहमी त्याला सांगायचो. कारण तो एक्स्ट्राची वाक्य घ्यायचा. त्याला आवर घालण्यासाठी मला असे वागणे भाग होते.'' लक्ष्मीकांत बेर्डे सचिन यांना म्हणाले की, ''हा डायलॉग खूप चांगला आहे. प्लीज आपण त्या सिनेमामध्ये घेऊ. मग सचिन पिळगावकर यांनी तो डायलॉग घ्यायला परवानगी दिली आणि लक्ष्या खूप खूश झाले आणि त्या डायलॉगने थिएटरमध्ये गोंधळ घातला.''