"मी स्वतःला 'महागुरू'..." ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलले सचिन पिळगांवकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 16:45 IST2025-04-08T16:45:20+5:302025-04-08T16:45:34+5:30
सचिन पिळगांवकरांनी त्यांना मिळालेल्या 'महागुरू' या उपाधीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

"मी स्वतःला 'महागुरू'..." ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलले सचिन पिळगांवकर
Sachin Pilgaonkar Trolling: आपल्या अभिनयाने मागील अनेक दशकं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारे प्रतिभावान अभिनेते म्हणजे सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar). फक्त अभियच नव्हे तर दिग्दर्शनही त्यांनी केलं. त्यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट मराठी इंडस्ट्रीला दिले आहेत. त्यांनी हिंदीतही खूप काम केलं आहे. सचिन पिळगांवकर यांनी सिनेमांबरोबरच 'एका पेक्षा एक' या डान्स रिॲलिटी शोचे परीक्षणही केलं आहे. या रिॲलिटी शोमध्ये सचिन पिळगांवकर मुख्य परीक्षक असल्याने त्यांना महागुरू या नावाने संबोधले गेलं. कालांतराने ही त्यांची ओळखच बनली. पण, यावरुन अनेक जण त्यांना ट्रोल करतात.
सचिन पिळगांवकरांनी तारांगणला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं. मी स्वतःला महागुरू समजत नाही, हे नाव 'झी मराठी'नं मला दिलंय, असं सचिन पिळगांवकरांनी थेटच सांगून टाकलं. ते म्हणाले, "महागुरू या नावाला तुम्ही पदवी म्हणा किंवा मग आणखी काही, ते मला झी वाहिनीने दिले आहे. ते मी स्वतः लावून घेतलेले नाव नाही. मी स्वतःला महागुरू समजतच नाही किंवा मानतही नाही".
"मला वाहिनीच्या लोकांनी पटवून दिलं की, आपण ते नाव का वापरायला हवं? तेव्हा या कार्यक्रमात त्या मुलांचे गुरु सुद्धा असणार होते, जे त्यांना डान्स शिकवणार होते. ते गुरू होते, म्हणूनच त्यांच्यावर मी असल्यानं मला महागुरू म्हटलं गेलं. पण मी स्वतःला कधीही महागुरू म्हटलं नाही. मी नेहमी स्वतःचा कुटुंब प्रमुख म्हणून उल्लेख करत असे, असं त्यांनी स्पष्ट केलं.