सचिन पिळगावकरांनी ट्रोलर्सची बोलती बंद केली; सतीश शाहांचा 'तो' अखेरचा मेसेज केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 11:28 IST2025-10-27T11:27:54+5:302025-10-27T11:28:56+5:30
सतीश शाह यांनी आपल्या निधनाच्या आधी म्हणजेच, दुपारी १२ वाजून ५६ मिनिटांनी त्यांना एक मेसेज पाठवला होता, असे पिळगावकर यांनी सांगितले.

सचिन पिळगावकरांनी ट्रोलर्सची बोलती बंद केली; सतीश शाहांचा 'तो' अखेरचा मेसेज केला शेअर
Sachin Pilgaonkar Shares Satish Shah Last Message: अभिनेते सतीश शाह यांचे २५ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. सतीश शाह यांच्या निधनानंतर त्यांचे मित्र व ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी शोक व्यक्त करत त्यांच्याशी अखेरचा संवाद झाल्याचं सांगितलं. सतीश शाह यांनी आपल्या निधनाच्या फक्त दोन तास आधी म्हणजेच, दुपारी १२ वाजून ५६ मिनिटांनी त्यांना एक मेसेज पाठवला होता, असे पिळगावकर यांनी सांगितले. सचिन पिळगावकर यांचं हे विधान भरपूर व्हायरल झालं. त्यानंतर प्रत्येक जण मरण्यापूर्वी सचिन पिळगावकर यांच्याशीच कसा संवाद साधतात? अशा आशयाच्या कमेंट्स करून अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली. प्रचंड ट्रोलिंग नंतर पिळगावकरांनी स्वतः फेसबुकवर पोस्ट शेअर करून लोकांना पुरावा दाखवला. ज्यामध्ये त्यांनी सतीश शाह यांनी पाठवलेला मेसेज व त्याची वेळ नमूद केली.
सचिन पिळगावकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी सतीश शाह यांनी पाठवलेला मेसेज व त्याची वेळ नमूद केली. त्यामध्ये त्यांनी लिहिलं, "हा माझा मित्र सतीश शाह यांनी काल दुपारी १२.५६ वाजता पाठवलेला शेवटचा मेसेज होता. त्याच्या आत्म्यास शांती लाभो. सचिन यांना सतीश यांनी एक इमेज पाठवली होती. ज्यामध्ये इंग्रजीत लिहिलेले की, "माझ्या वयामुळे लोक मला अनेकदा प्रौढ समजतात". सचिन पिळगावकर यांच्या या पोस्टवर अनेकांनी पुन्हा एकदा दुःख व्यक्त केले आहे.
काय म्हणाले होते सचिन पिळगावकर?
न्यूज एटीनला दिलेल्या मुलाखतीमध्ये सचिन पिळगावकर म्हणाले होते की, "सुप्रिया तीन दिवसांपूर्वीच सतीश आणि मधुला भेटायला गेले होती. मी शूटिंगमध्ये बिझी होतो त्यामुळे जाऊ शकलो नाही. त्यांनी तिथे गाणी लावलेली. त्यावर सुप्रिया आणि मधूने डान्सही केला. आम्ही दोघ सतत मेसेजवर बोलत असायचो. खरं सांगायचं तर आज दुपारी १२.५६ ला मला त्यांनी एक मेसेज केलेला. त्यांच्या जाण्याने इंडस्ट्रीच मोठ नुकसान झालं आहे पण ही माझ्यासाठी सुद्धा एक खूप मोठी वैयक्तिक हानी आहे".
सतीश शाह यांच्या मृत्यूचं कारण काय?
सतीश शाह यांच्या मृत्यूचे मुख्य कारण मूत्रपिंड निकामी होणे (Kidney Failure) हे होते. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी जेवण करत असताना ते अचानक कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मृत घोषित केले. यापूर्वी जूनमध्ये त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपण (Kidney Transplant) झाल्याचे वृत्त होते आणि त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत होती.