"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 12:49 IST2025-07-27T12:48:13+5:302025-07-27T12:49:06+5:30
पु,ल. देशपांडेंचा 'तो' प्रश्न आणि सचिनजी गांगरले, म्हणाले...

"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. 'हा माझा मार्ग एकला' या सिनेमातून त्यांनी पदार्पण केलं. 'अंखियों के झरोखों से','बालिका वधू' अशा एकापेक्षा एक सिनेमांमधून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचं दर्शन घडवलं. सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या करिअरमधील आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहेत जे कायम चर्चेत असतात. असाच एक किस्सा त्यांनी पु.ल. देशपांडे (Pu La Deshpande) यांच्यासोबतचाही सांगितला होता.
काही वर्षांपूर्वी 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर सहभागी झाले होते. तेव्हा सचिन खेडेकर यांच्याशी बोलताना सचिन पिळगावकरांनी पु.ल. देशपांडेंसोबतच्या भेटीचा किस्सा सांगितला होता. ते म्हणालेले की, "पु.ल. हे पहिले होते ज्यांनी मला विनोदाशी ओळख करुन दिली. मी सात-आठ वर्षांचा होतो. मी वडिलांसोबत एका लग्नाला गेलो होतो. तिथे गेल्या गेल्याच समोर पु.ल. उभे होते. बाबांनी त्यांना नमस्कार केला. मग त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, 'अरे सचिन, तू एकटा? बायको कुठेय?' मी सात-आठ वर्षांचाच होतो त्यामुळे गांगरलो. मला कळेना मी काय बोलावं. बायको आणायला हवी होती का..लग्नच नाही झालं माझं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी. ते माझ्याकडे बघून हसले आणि तेव्हा मला कळलं की हा विनोद होता. विनोद हा असा निखळ असावा. म्हणजे विनोद असावा तर तो दारासिंग सारखा असावा. म्हणजे उघडा असला तरी सशक्त आणि निरोगी असावा."
सचिन पिळगावकर यांनी अनेक दिग्गजांसोबत काम केलं आहे. तसंच अनेक मान्यवरांची भेटही घेतली आहे. वयाच्या सातव्या-आठव्या वर्षीच त्यांना दिग्गज व्यक्तींना भेटण्याची, बोलण्याची संधी मिळाली. त्यातच पु.लंही होते असं ते म्हणाले. सचिन पिळगावकर यांनी मराठी, हिंदी सिनेसृष्टीत छाप पाडली. अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार, गायक, डान्सर अशी त्यांची बहुगुणी ओळख आहे.