सचिन पिळगावकरांची लेक श्रियासाठी पोस्ट, कौतुक करत म्हणाले " तुझा विशेष अभिमान वाटतो"
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 17:05 IST2025-07-28T17:05:06+5:302025-07-28T17:05:50+5:30
सचिन पिळगावकर यांनी लेक श्रियाच्या कामाचं केलं कौतुक, म्हणाले...

सचिन पिळगावकरांची लेक श्रियासाठी पोस्ट, कौतुक करत म्हणाले " तुझा विशेष अभिमान वाटतो"
Sachin Pilgaokar Praises Daughter Shriya: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने स्थान निर्माण करणारे सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगावकर हे दोघंही प्रेक्षकांच्या मनामध्ये कायमचे घर करून बसले आहेत. आज त्याची 'एकुलती एक' मुलगी श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) अनेक दर्जेदार प्रोजेक्ट्समधून चमकत आहे. अलिकडेच श्रिया पिळगावकर हिची 'मंडला मर्डर्स' ही सीरिज प्रदर्शित झाली आहे. यामधील लेकीच्या कामगिरीबद्दल सचिन पिळगांवकर यांनी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत तिचं भरभरून कौतुक केलं.
नुकतंच सचिन व सुप्रिया यांनी लाडक्या लेकीची 'मंडला मर्डर्स' ही सीरिज पाहिली. त्यानंतर त्यांनी इन्स्टाग्रामवर लेकीचं कौतुक करीत पोस्ट केली आहे. सचिन यांनी तिचे वेब सीरिजमधील काही फोटो शेअर करीत कौतुक केलं आहे. त्यांनी लिहलं, "तुला जे काही प्रेम मिळत आहे त्यासाठी अभिनंदन श्रिया. तू साकारलेल्या प्रत्येक भूमिकेतून तुझी क्षमता दिसते. प्रत्येक वेळी तुझा अभिनय पाहून थक्क व्हायला होतं".
पुढे ते म्हणाले, "'मंडला मर्डर्स'मधील रुक्मिणीच्या भूमिकेसाठी आम्हाला तुझा विशेष अभिमान वाटतो.ही भूमिका तुझ्या इतर भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. तू दाखवून दिलंस की, फक्त काही सीनमधूनसुद्धा एक कलाकार त्याच्या कामानं प्रेक्षकांच्या मनावर कशी छाप सोडू शकतो. नेहमी अशीच खुलत रहा, तुला सदैव आशीर्वाद!", या शब्दात सचिन यांनी लेकीच्या कामाचं कौतुक केलं. सचिन यांची ही पोस्ट केवळ वडिलांच्या प्रेमाने ओतप्रोत नव्हे, तर एका कलाकारानं दुसऱ्या कलाकाराला दिलेली मनापासूनची दाद आहे.
श्रिया मराठमोळी मुलगी असूनही तिने हिंदीमध्ये आपला डंका गाजवला आहे. श्रियाने 'एकुलती एक' या मराठी सिनेमातून पदार्पण केलं होतं. नंतर तिने शाहरुख खानच्या 'फॅन' सिनेमातून हिंदीत पदार्पण केलं. यानंतर श्रियाला हिंदी सीरिजच्या ऑफर्स मिळत गेल्या. 'ताजा खबर', 'द ब्रोकन न्यूज', 'मिर्झापूर', 'छलकपट' अशा अनेक वेब सिरिजमधून ती प्रसिद्धीझोतात आली आहे. श्रियानं काही शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शनही केलं आहे. श्रिया ओटीटी माध्यमात रुळली असली तरी तिला पुन्हा मराठीत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.