“मी त्याला आदल्या दिवशीच कॉल केलेला, तो आम्हाला...”, सचिन चांदवडेच्या आत्महत्येनंतर दिग्दर्शकाचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:14 IST2025-10-28T17:14:34+5:302025-10-28T17:14:59+5:30
सचिनच्या आत्महत्येनंतर त्याच्या आगामी सिनेमाच्या दिग्दर्शकांनी मोठा खुलासा केला आहे. आत्महत्येच्या आदल्या दिवशीच त्याच्याशी फोनवर बोलणं झाल्याचं त्यांनी सांगितलं.

“मी त्याला आदल्या दिवशीच कॉल केलेला, तो आम्हाला...”, सचिन चांदवडेच्या आत्महत्येनंतर दिग्दर्शकाचा मोठा खुलासा
अभिनेता सचिन चांदवडेच्या आत्महत्येने मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अवघ्या २५व्या वर्षी सचिनने आत्महत्या करत जीवन संपवलं. विशेष म्हणजे त्याने काही दिवसांपूर्वीच त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टर शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली होती. सचिनने असं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पण, सचिनच्या आत्महत्येनंतर त्याच्या आगामी सिनेमाच्या दिग्दर्शकांनी मोठा खुलासा केला आहे. आत्महत्येच्या आदल्या दिवशीच त्याच्याशी फोनवर बोलणं झाल्याचं त्यांनी सांगितलं.
सचिन 'असुरवन' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. या सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने दिग्दर्शक सचिन अंबात यांनी अभिनेत्याला फोन केला होता. दिग्दर्शक सचिन अंबात यांनी सांगितलं की “मी एक दिवसापूर्वीच त्याला शेवटचा कॉल केला होता. सिनेमाच्या प्रमोशनच्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आम्ही सगळे टीम मेंबर्स, कलाकार भेटणार होतो. त्यासाठी मी त्याला कॉल करून ठाण्याला बोलवलं होत. त्याने ही मी जळगाववरून नक्की येतो अस मला सांगितलं होतं. तो खूप उत्साहित होता फिल्मच्या प्रदर्शनासाठी. त्याच्या सिनेमातील भूमिकेच्या पोस्टरला मिळणारा प्रतिसाद बघून तो खूश होता. त्याबद्दल तो माझ्याशी उत्साहाने बोलत होता. लाखो व्ह्यूज त्याच्या पोस्टरवर आले होते".
पुढे ते म्हणाले, “ठाण्याला भेटून आम्ही सेलिब्रेट करणार होतो. पण ते शक्य झाले नाही. आम्ही भेटण्याआधीच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. ही बातमी ऐकून आम्ही सगळेच शॉकमध्ये आहोत. हे असं का केलं त्याने , ह्याबद्दल काहीच कळतनाहीये. सतत हसतमुखी, मनमिळाऊ असा माझा लहान भाऊ गमावला याचं दुःख कायम असेल. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आम्हाला एकत्र पाहायचा होता. हे स्वप्न आमचं सत्यात उतरणार होतं. आता हे स्वप्न स्वप्नचं राहील. पण तो कायम माझ्या आठवणीत राहील”.