स्मिता पाटील यांच्यासोबतच्या तुलनेवर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया, म्हणाली, "बाईला संघर्ष आजही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 17:55 IST2025-12-08T17:55:00+5:302025-12-08T17:55:45+5:30
त्याकाळी त्यांनाही असाच सिनेमा करावा लागला आणि आज मलाही..., काय म्हणाली रिंकू?

स्मिता पाटील यांच्यासोबतच्या तुलनेवर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया, म्हणाली, "बाईला संघर्ष आजही..."
रिंकू राजगुरु 'सैराट' सिनेमातून प्रसिद्धीझोतात आली. त्यावेळी रिंकू फक्त ९ वीत होती. आज ती विविध भूमिकांमधून समोर येत आहे. तिच्या अभिनयाचे अनेक पैलू समोर येत आहेत. अनेकदा रिंकूकडे पाहून स्मिता पाटील यांचा भास होतो अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली होती. आता नुकतंच रिंकूने स्मिता पाटील यांच्यासोबत होणाऱ्या तुलनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
'नवशक्ती'ला दिलेल्या मुलाखतीत रिंकू राजगुरु म्हणाली, "तुलना होते हीच खूप मोठी गोष्ट आहे. मीही अनेकदा वाचलं की लोक माझे फोटो पाहून स्मिता पाटील यांची आठवण येते म्हणतात. त्यांना स्मिता पाटील यांचाच भास होतो. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सोबतच वाईटही वाटतं की त्याकाळी त्यांना अशाच प्रकारचा सिनेमा करुन जनजागृती करावी लागली आणि आज मलाही अशाच प्रकारचा सिनेमा करुन लोकांना सांगावं लागतंय की आता बदला..आता याची आपल्याला गरज आहे. त्यामुळे कितीही काळ लोटला तरी बाईला संघर्ष आजपर्यंत चुकलेला नाही. पण अशा भूमिका करायला मिळतायेत याचा आनंदही आहे."
ती पुढे म्हणाली, "मी खरंतर स्मिता पाटील यांच्या सिनेमांच्या जवळपासही नाही पण तशा प्रकारची कामं तरी माझ्या वाट्याला येतायेत. त्यातून मला महिलांची बाजू मांडता येतीये. कुठेतरी हा सिनेमा बघून नक्कीच लोक विचार करतील असं मला वाटतंय. मी त्यांचे बरेच सिनेमेही पाहिले आहेत. स्मिता आणि मी हे पुस्तक मी वाचलं होतं. त्यात मी स्वत:लाच पाहिलं होतं. माझे आणि त्यांचे विचार आणि मत किती जुळतात हे मला जाणवलं. असं झालं की तो व्यक्ती आणखी जवळचा वाटाला लागतो. मी त्यांच्या कामाचं खूप निरीक्षण करते."