आर्चीचा 'आशा' होण्यापर्यंतचा प्रवास; सिनेमाच्या शूटिंगचे किस्से आणि टीमची खास मुलाखत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:18 IST2025-12-18T18:17:14+5:302025-12-18T18:18:26+5:30
'आशा' सिनेमाच्या निमित्ताने सर्वांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू, दिग्दर्शक दीपक पाटील आणि निर्माती दैव्यता पाटील यांनी 'लोकमत'ला खास मुलाखत देत सिनेमाचा प्रवास सांगितला.

आर्चीचा 'आशा' होण्यापर्यंतचा प्रवास; सिनेमाच्या शूटिंगचे किस्से आणि टीमची खास मुलाखत
>>कोमल खांबे
कोणताही स्वार्थ न ठेवता महिलांसाठी, लहान मुलांच्या सेवेसाठी आशा वर्कर या सदैव तत्पर असतात. ज्यांच्याकडे आपल्यापैकी फार कमी जणांचे लक्ष जाते. त्यांच्या कामाची दखल घेणारा 'आशा' हा सिनेमा १९ डिसेंबरपासून आपल्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सर्वांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू, दिग्दर्शक दीपक पाटील आणि निर्माती दैव्यता पाटील यांनी 'लोकमत'ला खास मुलाखत देत सिनेमाचा प्रवास सांगितला.
आशाताई या विषयावर सिनेमा का करावासा वाटला?
दिग्दर्शक: या सिनेमात रिंकूच्या भूमिकेचे नाव मालती आहे. २०-२२ वर्षांची ही तरुणी आहे. ती आशा ताईचे जरी काम करत असली तरी तिला स्वत:ची ओळख निर्माण करायची आहे आणि त्यासाठी ती झटत असते. तिचा प्रवास या सिनेमात बघायला मिळणार आहे. कोरोना काळात आशाताईंचे काम बघितले होते आणि तेव्हा कुतुहल निर्माण झाले होते. त्यानंतर मग यावर सिनेमा करायचे ठरवले.
'आशा' या सिनेमाचे कास्टिंग कसे झाले?
दिग्दर्शक: सिनेमातील मालतीचे व्यक्तिमत्व हे खूप परखड आहे. एक प्रेक्षक म्हणून मला असे वाटत होते की रिंकू या भूमिकेसाठी जाऊ शकते. आम्ही इतर अभिनेत्रींचे ऑडिशन घेतले होते. मग एकदा रिंकूला विचारून बघुया असे ठरले. त्यानंतर रिंकूला कथा सांगितल्यानंतर तिने भूमिकेसाठी होकार दिला. रिंकूनंतर मग सिनेमातील साईंकित कामत, उषा नाईक, हर्षा गुप्ते, सुहास शिरसाट, शुभांगी भुजबळ यांचे कास्टिंग करण्यात आले.
या सिनेमातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?
रिंकू: सिनेमाची कथा ऐकल्यानंतर छान वाटली होती. या विषयावर याआधी सिनेमा झालेला नाही किंवा कोणाला करावासा वाटला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आईचे नावही आशा आहे आणि ती एक शिक्षिका आहे. मालतीविषयी सांगायचे झाले तर ती खूप हुशार आणि चिकाटी असणारी आहे. हातात घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय ती शांत बसू शकत नाही. त्या कामासाठी जे जे करायला लागेल ते सर्व करण्याची तिची तयारी आहे, अशी ही व्यक्तिरेखा आहे.
मालती या आशाताईची भूमिका साकारण्यासाठी काही खास तयारी केली का?
रिंकू: शूटिंगच्या आधी मी आशाताईंना भेटले होते. ज्या गावात आम्ही शूटिंग केले त्या गावातील आशा वर्करसोबत राहून मी त्यांचे काम जाणून घेतले होते. त्यांच्याशी बोलून मी त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. शूटिंग करतानाही आमच्यासोबत दोन आशाताई होत्या.
या सिनेमाची निर्मिती करताना काय विशेष काळजी घेतली गेली?
निर्माती: नवीन विषय असल्यामुळे आणि प्रेक्षकांनाही काहीतरी नवीन पाहायला मिळणार असल्यामुळे या सिनेमाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. दुसरे म्हणजे महिलांची गोष्ट महिलांनीच सांगावी या अनुषंगाने आम्ही टीममध्येही जास्तीत जास्त महिला घेण्याचा प्रयत्न केला होता. आमच्या टीममध्ये सिनेमाची ए़डिटर, साऊंड इंजिनियर यादेखील महिलाच आहेत.