प्रिया बेर्डे यांनी लेकाच्या पहिल्याच 'ती सध्या काय करते' सिनेमासाठी दिलेला नकार, यामागचं कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 15:09 IST2025-12-10T15:07:38+5:302025-12-10T15:09:55+5:30
Priya Berde and Abhinay Berde :अभिनय बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांनी लोकमत फिल्मीच्या सेलिब्रेटी किड्स या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यावेळी बोलताना प्रिया बेर्डे यांनी अभिनयच्या पदार्पणातील सिनेमा 'ती सध्या काय करतेय'ला सुरुवातीला नकार दिल्याचे सांगितले.

प्रिया बेर्डे यांनी लेकाच्या पहिल्याच 'ती सध्या काय करते' सिनेमासाठी दिलेला नकार, यामागचं कारण आलं समोर
अभिनय बेर्डे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने वडील लक्ष्मीकांत बेर्डे आणि आई प्रिया बेर्डे यांच्या पावलावर पाऊल टाकत सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. 'ती सध्या काय करतेय' हा त्याचा पहिला सिनेमा. या सिनेमातील त्याच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं. पण तुम्हाला माहित आहे का, की या सिनेमात काम करण्यासाठी प्रिया बेर्डे यांनी नकार दिला होता. त्यामागचं कारण आता त्यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
अभिनय बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांनी लोकमत फिल्मीच्या सेलिब्रेटी किड्स या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यावेळी बोलताना प्रिया बेर्डे यांनी अभिनयच्या पदार्पणातील सिनेमा 'ती सध्या काय करतेय'ला सुरुवातीला नकार दिल्याचे सांगितले. तसेच त्यांनी त्यामागचं कारणदेखील सांगितलं. त्या म्हणाल्या की, "अभिनय आम्हाला लहानपणापासून अभिनय करताना पाहतो आहे. त्यामुळे त्याने सुद्धा या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला होता. मला माहीत होतं की हा आता हेच करणार आहे. आई वडील मुलांना त्यांच्या क्षेत्रात आणतात. काही आई वडील स्वतःच्या मुलाला लाँच करतात. सिनेमा बनवतात. अभिनयला लाँच करायला तेव्हा लक्ष्मीकांत नव्हते. तसं मी अभिनयसाठी काही करू शकणार नव्हते. त्याच्यासाठी मी कुठल्या सिनेमाची निर्मिती करू शकणार नव्हते. कारण सिनेमा तयार करण्यासाठी खूप गोष्टी लागतात त्यामुळे जेव्हा अभिनयला 'ती सध्या काय करते' या सिनेमाची ऑफर आली तेव्हा मी नाहीच म्हटलं होतं."
" तेव्हा माझं मत असं होतं की. तो आता शिकत आहे. त्याला कुठलच अनुभव नाही. त्याला अभिनयातला 'अ' सुद्धा माहीत नाही. त्यामुळे त्याला शिकणं गरजेचं आहे. स्वप्नं बघणं, आपल्यात टॅलेंट असणं आणि आपण प्रोफेशनली काम करणं यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे हे कसं होणार ही चिंता आई म्हणून मला साहजिकच येणार. पण सतीश राजवाडेंनी मला आत्मविश्वास दिला आणि अभिनयकडून उत्तम काम करून घेतलं." , असं प्रिया बेर्डेंनी सांगितलं.