प्रिया बापट पुन्हा साकारणार लेस्बियन भूमिका, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 16:37 IST2021-03-06T16:36:30+5:302021-03-06T16:37:05+5:30
अभिनेत्री प्रिया बापट हिने सिटी ऑफ ड्रिम्स या वेब सीरीजमध्ये लेस्बियन महिलेची भूमिका साकारली होती.

प्रिया बापट पुन्हा साकारणार लेस्बियन भूमिका, जाणून घ्या याबद्दल
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट हिने सिटी ऑफ ड्रिम्स या वेब सीरीजमध्ये लेस्बियन महिलेची भूमिका साकारली होती. या वेबसिरीजमध्ये तिने किसिंग सिन देखील दिले होते. त्यावरून बरीच चर्चाही झाली होती. आता पुन्हा एकदा प्रिया बापट अशाच प्रकारची भूमिका निभावणार आहे. फादर लाईक या चित्रपटात ती ही भूमिका साकारणार असून हा चित्रपट तिचा पहिला आंतरराष्ट्रीय सिनेमा असणार आहे.
फादर लाईक या चित्रपटात प्रिया ही साराहची भूमिका साकारणार असून तिच्या लेस्बियन गर्लफ्रेंडची भूमिका अभिनेत्री गितीका विद्या ओहलान साकारणार आहे. गितीकाच्या भूमिकेचे नाव सेरेना असून ती लॉकडाऊनमध्ये सिंगापूरला अडकते. लॉकडाऊनमधील त्यांच्या लाँग डिस्टन्स रिलेशनशीप बाबत या चित्रपटात दाखवले आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य क्रिपलानी यांनी केले आहे. सिंगापूरमध्ये याचे चित्रीकरण सुरू होणार आहे. पहिल्याच इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी प्रिया उत्सुक आहे.
याशिवाय 'प्रिया सिटी ऑफ ड्रीम्स'च्या दुसऱ्या सीझनमध्ये देखील झळकणार आहे. तिने नुकतेच या वेब सीरिजचे शूटिंग पूर्ण केले आहे आणि त्याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.
'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसली होती.