"अभिनेता व्हालच पण आधी...", अभिनेता प्रवीणकुमार डाळिंबकरला प्रत्येक पावलावर लाभले गुरु
By अबोली कुलकर्णी | Updated: July 17, 2025 11:51 IST2025-07-17T11:45:57+5:302025-07-17T11:51:52+5:30
अभिनेता प्रवीणकुमार डाळिंबकर नुकतंच 'आता थांबायचं नाय' सिनेमात दिसला. आयुष्यात गुरुंचं असलेलं महत्व त्याने सांगितलं आहे.

"अभिनेता व्हालच पण आधी...", अभिनेता प्रवीणकुमार डाळिंबकरला प्रत्येक पावलावर लाभले गुरु
>> अबोली कुलकर्णी
गुरू आपल्या आयुष्याला दिशा देतात. माझ्या आयुष्यात अनेक गुरू आहेत. गुरूंचे वर्गीकरण करता येत नाही. तरी पण, आपल्या सर्वांची पहिली गुरू आईच असते. माझी आई गोजरबाई डाळिंबकर ही माझी पहिली गुरू. तिचे ऋण मी आयुष्यभर फेडू शकणार नाही. शाळा माणसाला आयुष्याचा धडा देते. पहिला पाया शाळेतच भक्कम बनतो. शाळेतून उत्तीर्ण झाल्यावर मी २००४ ते २००७ या वर्षात विवेकानंद महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे अभिनयाचे धडे गिरवले. तिथे मला माझ्या आयुष्याला वळण देणारे प्रा. दिलीप महालिंगे सर भेटले. त्यांच्याकडून खुप गोष्टी शिकायला मिळाल्या. अभिनयातील बारकावे समजले. ते म्हणायचे, ‘कधीही कुणाला घाबरायचं नाही. आपण कुठून, कशासाठी आलोत ते कायम लक्षात ठेवायचे. अभिनेता तर तुम्ही व्हालच, पण आधी चांगला माणूस बना.’
२००७ रोजी मी पुढील शिक्षणासाठी ‘मुंबईत दाखल झालो. ‘अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स’मध्ये मी शिकलो. मुंबईला जाणं हे माझ्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. तिथे मला पद्मश्री वामन केंद्रे आणि प्रा. शफाद खान सर भेटले. डॉ मंगेश बनसोड त्यांनी मला सांगितलं, ‘आपल्याला काय येतं ते आधी ओळखा. तुम्ही कसे गावखेड्यातून, संघर्ष करत आलात, ते बघा. एकदा मी २० वेळेस ऑडिशन दिले. तरी दुसऱ्या कुणालातरी ती भूमिका दिली गेली. मग वामन केंद्रे सरांनी मला नाराज होऊ न देता आत्मविश्वास दिला. आयुष्यात संधी येत असतात, परीक्षा देणं हेच आपलं काम असतं.’
मुंबईच्या रविंद्र नाट्य मंदिर येथे पँथरचा वर्धापनदिन होता. तेव्हा आम्ही तिथे कवी नामदेव ढसाळ सरांच्या उपस्थितीत ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग करत होतो. त्यावेळी तिथे एक व्यक्ती आली आणि ते मला म्हणाले, ‘मी तब्बल २२ वेळेस नाटक पाहिले. तुम्ही शिवाजी महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवत आहात. तुम्ही खुप चांगले कार्य करत आहात. तुमचे कौतुक व्हायला हवे.’ आम्ही या नाटकाचे जवळपास ७०० ते ८०० प्रयोग केले. अशावेळी वाटते की, प्रेक्षक हेच आपले गुरू असतात. ते आपल्याला दाद देतात. आपली पाठ थोपाटतात. त्यांच्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचू शकलो.
या सगळयांत मी दिग्दर्शक नागराज मंजुळे आण्णांचं नाव विशेषत्वाने घेतो. २०२१ मधील ‘घर बंदुक बिर्याणी’ या चित्रपटावेळी माझी अन् त्यांची भेट झाली. त्यांच्या सहवासात मी अनेक गोष्टी शिकलो, घडलो. ते नेहमी सांगतात, प्रविण, आयुष्यात कुठलीही परिस्थिती असो, बिल्कुल घाबरायचं नाही. काम करत राहायचं, त्यातच खरा आनंद असतो. कामाच्या व्यापात कधीही आनंद हरवायचा नाही.’ ह्याच सिनेमातील घुरा ह्या पात्रा साठी मला राज्य शासनाचे सहाय्यक अभिनेत्याचे नामांकन मिळाले आहे .