वाह रे पठ्ठ्या! ऑस्ट्रेलियामध्ये कराडमधील मराठमोळ्या तरुणाचा व्यवसाय पाहून भारावले प्रवीण तरडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 14:21 IST2023-03-08T14:19:13+5:302023-03-08T14:21:12+5:30
Pravin Tarde : प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे सध्या पत्नी स्नेहल यांच्यासोबत ऑस्ट्रेलियामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत.

वाह रे पठ्ठ्या! ऑस्ट्रेलियामध्ये कराडमधील मराठमोळ्या तरुणाचा व्यवसाय पाहून भारावले प्रवीण तरडे
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रयोगशील दिग्दर्शक आणि उत्तम अभिनेता म्हणजे प्रवीण तरडे (Pravin Tarde). देऊळ बंद, सरसेनापती हंबीरराव, मुळशी पॅटर्न अशा दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन करून प्रवीण तरडे यांनी रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यांचे काही आगामी चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. सध्या प्रवीण यांना त्यांच्या व्यग्र कामामधून निवांत वेळ मिळाला असून ते सध्या पत्नी स्नेहल तरडेसोबत ऑस्ट्रेलियामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.
प्रवीण तरडे आणि स्नेहल ऑस्ट्रेलियामधील विविध शहरांमध्ये भटकंती करत आहेत. यादरम्यानचेच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. असाच एक शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मराठमोळ्या तरुणाने ऑस्ट्रेलियांमध्ये जाऊन त्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. याचबाबत प्रवीण तरडेंनी एक व्हिडीओ फेसबुकद्वारे शेअर केला आहे.
प्रवीण तरडे म्हणाले की, ऑस्ट्रेलियातील मराठीबाणा. ६५ किलो घरी बनवलेले फरसाण घेऊन कराडचा योगेश चव्हाण हा मराठी तरूण ॲास्ट्रेलियात आला. आज इथे वर्षाला ७० हजार किलोचा माल तो विकत आहे. आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधून त्याला उद्योजक तयार करायचे आहेत.
महाराष्ट्रातील विविध भागातून येणारे खाद्यपदार्थ योगेश ऑस्ट्रेलियामध्ये विकतात. तसेच महाराष्ट्रातील छोट्या उद्योजकांनाही फायदा मिळवून देतात. गेली २२ वर्ष ते परदेशात व्यवसाय करत आहेत. योगेश यांचा मराठी माणसाला अभिमान असला पाहिजे असेही प्रवीण तरडेंनी या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. प्रवीण यांच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळते आहे.