AI ट्रेंडसंदर्भात प्रथमेश परबच्या पत्नीने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली "तर देशही कुठच्या कुठे जाईल."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 10:37 IST2025-09-17T10:36:35+5:302025-09-17T10:37:10+5:30

अभिनेता प्रथमेश परबची पत्नी क्षितिजा घोसाळकर हिनेही या ट्रेंडशी संबंधित एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Prathamesh Parab Wife Kshitija Ghosalkar Share Video Google Gemini Banana Ai Saree Trend And Real Life Rules | AI ट्रेंडसंदर्भात प्रथमेश परबच्या पत्नीने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली "तर देशही कुठच्या कुठे जाईल."

AI ट्रेंडसंदर्भात प्रथमेश परबच्या पत्नीने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली "तर देशही कुठच्या कुठे जाईल."

सध्या सोशल मीडियावर विशेषतः इन्स्टाग्रामवर गुगल जेमिनीचा एक नवीन ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 'नॅनो बनाना' AI ट्रेंड या नावाने ओळखला जाणारा हा ट्रेंड 'घिब्ली' ट्रेंडलाही मागे टाकत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. यामध्ये, कोणताही सामान्य फोटो वापरून त्याला रेट्रो लूकमध्ये एआयच्या मदतीने बदलले जाते. हा ट्रेंड इतका लोकप्रिय झाला आहे की, सामान्य नेटकऱ्यांपासून ते अनेक कलाकारांपर्यंत अनेकजण यात सहभागी होताना दिसत आहेत. नुकतंच अभिनेता प्रथमेश परबची पत्नी क्षितिजा घोसाळकर हिनेही या ट्रेंडशी संबंधित एक व्हिडीओ शेअर केला आहे.

क्षितीजानं "ट्रेंड फॉलो करताना नियमांचे पालन करायला विसरू नका" असं कॅप्शन देत एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात ती म्हणाली, "कव्हर फोटोवरून तुम्हालाही असं वाटलं असेल की, मी हा ट्रेंड फॉलो केला आहे की काय? मी ट्रेंड फॉलो नाही केलाय. पण माझ्या मित्रमंडळींनी माझे अनेक छान छान फोटो एडिट करून पाठवले आहेत. त्यामुळे मला तरी हा ट्रेंड प्रचंड आवडला आहे. फोटोशूट केल्यासारखे सर्व फोटो कमाल दिसत आहेत. पण, या ट्रेंडसंबंधित एक किस्सा मी शेअर करणार आहे.

क्षितीजा म्हणाली, "मी ऑफिसवरून घरी येण्यासाठी स्टेशनवर पोहोचले, खूप पाऊस होता. त्यामुळे थोडा वेळ रेल्वे स्टेशनवर बसले होते. तर माझ्या बाजूला कॉलेजमध्ये जाणाऱ्या दोन मुली बसल्या होत्या आणि त्यांच्यात सध्याचे ट्रेंड, फोटो एडिट, रील्स आणि ते कसं करायचे? याबद्दल गप्पा सुरू होत्या. पुढच्या पाच मिनिटात त्यांची ट्रेन आली आणि त्या ट्रेन पकडण्यासाठी धावत गेल्या.  धावत जाण्याआधी त्यांनी काय केलं, तर त्यापैकी एका मुलीच्या हातात हातात एक कुरकऱ्यांचं पाकीट आणि छोटी कोल्ड्रिंक्सची बॉटल होती. दोन्ही संपलेले होतं. तर त्या जिथे बसलेल्या होत्या, तिथेच त्याच्या बाजूला एक कचराकुंडी होती, जिथे त्या कचरा टाकू शकल्या असत्या. पण त्यांनी तो कचरा कचराकुंडीत न टाकता प्लॅटफॉर्मवरच टाकून ट्रेन पकडून निघून गेल्या"

पुढे तिनं सांगितलं, "हे सगळं बघून मला असं वाटलं की, सोशल मीडियावरचे कुठलेही ट्रेंड्स आपण ज्या वेगाने फॉलो करतो, तर त्याच वेगाने आपण काही साधे नियम पाळले तर? म्हणजे अगदी सोपं की, कुठेही कचरा न फेकणं, वाहतुकीचे नियम पाळणे आणि कुणालाही दिलेली वेळ पाळणे किंवा आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही, याची काळजी घेणे. इतके साधे नियम जरी पाळले तरी खूप आहे. पण नाही… सोशल मीडियावर कुल दिसण्यासाठी आणि आपल्याला ते ट्रेंड्स आधी फॉलो करायचे आहेत. आणि आयुष्यातील नियम काय, ते तर होत राहील.  फक्त विचार करा, आपण सोशल मीडियावरील ट्रेंड्स ज्या वेगाने फॉलो करतो, तेवढ्याच वेगात आपण आपल्या खऱ्या आयुष्यातील सोपे सोपे नियम पाळले तर? आपल्यामुळे देशही कुठच्या कुठे जाईल... पण, फरक इतकाच आहे की, सोशल मीडियावर ते व्हायरल नाहीत ना", असं म्हटलं. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी सहमती दर्शवली आहे. प्रथमेश परबनंही "खरं आहे" अशी कमेंट केली. 


Web Title: Prathamesh Parab Wife Kshitija Ghosalkar Share Video Google Gemini Banana Ai Saree Trend And Real Life Rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.