"कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं", प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 11:37 IST2025-01-28T11:36:04+5:302025-01-28T11:37:17+5:30
प्राजक्ताची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

"कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं", प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट चर्चेत
Prajakta Mali Performed Laavni: मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. प्राजक्ता ही तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे जितकी ओळखली जाते तितकीच ती आध्यात्मिकही आहे. आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravishankar) यांना ती फॉलो करते. प्राजक्ताने त्यांचा आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्सही केला आहे. सध्या प्राजक्ता रविशंकर यांच्या बंगळुरु येथील आश्रमात गेली आहे.
अलीकडेच प्राजक्तानं आश्रमात आयोजित करण्यात आलेल्या 'भाव २०२५' या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात लावणी सादर केली. आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्यासमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळाल्यानं प्राजक्तानं आनंद व्यक्त केलाय. प्राजक्ताने लावणी कला सादर करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्तानं पोस्ट शेअर करत लिहलं, "आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या बंगळुरू आश्रमामध्ये तेही गुरूदेवांसमोर लावणी नृत्य सादर करेन; असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि याचा अत्यंत आनंद झाला की जवळपास सर्व "पद्म पुरस्कार विजेत्या" कलाकारांच्या मांदियाळीत. भरतनाट्यम्, कथक, कुचिपूडी, कथकली, हिंदुस्तानी- कर्नाटक संगीताच्या थोडक्यात शास्त्रीय- उपशास्त्रीय नृत्य संगीताच्या मेळाव्यात 'लावणीला आणि त्यायोगे मला' जागा मिळाली. गुरूदेवांसमोर थिरकताना मला किती आनंद झाला, हे फोटोतल्या हास्यावरून कळतच असेल". प्राजक्ताच्या या पोस्टवर अनेकांनी लाईक्सचा वर्षाव केलाय.
प्राजक्ता माळीला आपण आजवर विविध सिनेमा, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. ती आता फक्त अभिनेत्री नसून उद्योजिकादेखील आहे. तिचा प्राजक्तराज हा तिचा दागिन्यांचा ब्रँड आहे. यातून ती दागिन्यांची आवड असणाऱ्यांसाठी इतिहासकालीन दागिने पुन्हा एकदा नव्याने उपलब्ध करून देते. तिच्या या पारंपारिक दागिन्यांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळताना दिसतो.