प्रार्थना बेहरेला ह्या व्यक्तीने शिकविला झुम्बा डान्स, नाव वाचून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 19:26 IST2019-01-07T19:20:37+5:302019-01-07T19:26:09+5:30
“लव यु जिंदगी” ११ जानेवारीला महाराष्ट्रभर प्रदर्शित होतो आहे.

प्रार्थना बेहरेला ह्या व्यक्तीने शिकविला झुम्बा डान्स, नाव वाचून व्हाल थक्क
“मी सिनेमात झूम्बा डान्सरची भूमिका करते आहे, चित्रपटात मी अनिरुद्धला म्हणजे सचिन सरांना झूम्बा शिकवते! पण प्रत्यक्षात शूटिंगवेळी त्यांनीच मला झूम्बाच्या स्टेप्स शिकवल्या! मला जाम टेन्शन आलं होतं सचिन सरांना झूम्बाच्या सूचना देताना!” कायम टवटवीत असलेली प्रार्थना बेहरे तिच्या ११ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या “लव यु जिंदगी” सिनेमाबद्दल बोलताना शूटिंग करतानाचे किस्से सांगत होती.
मनोज सावंत यांचा लव यु जिंदगी करताना सेटवर कायम मजामस्तीचे वातावरण होते. सचिन पिळगावकर सरांसोबत आणि कविता लाड मेढेकर यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली. सचिन सर सेटवरील वातावरण कायम तजेलदार ठेवत. कधी ‘प्रॅंक्स’ करत. एक दिवस मला सेटवर यायला उशीर झाला असता सचिन सरांनी सगळ्यांना राग आल्याचे नाटक करायला, माझ्याशी कोणी न बोलायला सांगितले. मला ते वातावरण बघून खूप ताण आला, अपराधी वाटू लागले. पण नंतर सगळे हसू लागले आणि माझा जीव भांड्यात पडला. कधी सचिन सर मुद्दाम खास कठीण मराठी शब्दांचा अर्थ विचारायचे, ज्याचा अर्थ मला कळायचा नाही. मग तेच त्या शब्दांचा अर्थ समजावून सांगायचे. एकूणच चित्रपट करताना धमाल आली. शूटिंग कधी पूर्ण झाले कळले देखील नाही, असे प्रार्थना सांगत होती.
हा सिनेमा का करावासा वाटला हे विचारल्यावर प्रार्थना म्हणाली की तिला हा सिनेमा स्वप्नील जोशीमुळे मिळाला. स्वप्नीलने हा सिनेमा करशील का फोन करून विचारले. सचिन सरांसोबत काम करायचेच होते म्हणून देखील हा सिनेमा मी केला प्रार्थनाने सांगितले.
सिनेमातील रिया आणि मुळातील प्रार्थनामध्ये खूप साम्य आहे ती म्हणाली. “लव यु जिंदगीमधील रिया स्वतःच्या आत्मविश्वासावर आयुष्य जगणारी, आत्मविश्वासाने भरलेली, खूप विचार न करणारी, भरभरून आयुष्य जगणारी आहे, मी देखील तसंच जगते!” प्रार्थनाने तिच्या भूमिकेबद्दल आणि स्वतःबद्दल सांगितले.
तिच्या आयुष्यातील लव यु जिंदगी क्षण म्हणजे आयुष्यातील आनंदाचा क्षण विचारला असता प्रार्थना म्हणाली की, ती प्रत्येक दिवस संपूर्णपणे जगते, ती दररोज जीवनावर प्रेम करते. लव यु जिंदगी ती फक्त म्हणत नाही तर ते खरोखर जगते. प्रत्येक क्षण व्यक्तींनी आनंदाने जगावा, प्रथम स्वतःवर, जीवनावर, आणि आपल्या आजूबाजूला असणाऱ्यांवर प्रेम करावं! लव यु जिंदगी चित्रपट देखील तेच सांगतो, कायम सुंदर, तजेलदार दिसणारी प्रार्थना चेहऱ्यावर सुंदर हास्य आणत म्हणाली.
लव यु जिंदगी सिनेमा का बघावा विचारलं असता प्रार्थना म्हणाली की हा संपूर्ण चित्रपट कौटुंबिक मनोरंजन करणारा आहे. ज्यांना आयुष्यावर प्रेम करायचंय, जे आयुष्यावर स्वतःवर प्रेम करतात त्या प्रत्यकाने हा सिनेमा बघावाच.
सचिन पिळगावकर, कविता लाड मेढेकर आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला, हसवणारा, भावनिक करणारा, एसपी प्रॉडक्शन्स लिमिटेड, सचिन बामगुडे निर्मित, मनोज सावंत दिगदर्शित कौटुंबिक मनोरंजक चित्रपट “लव यु जिंदगी” ११ जानेवारीला महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय.