शरद पवारांनी पत्नीसह थिएटरमध्ये जाऊन पाहिला 'सत्यशोधक' चित्रपट; म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 14:46 IST2024-01-14T14:42:09+5:302024-01-14T14:46:38+5:30
नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सपत्नीक यांनी 'सत्यशोधक' हा चित्रपट पाहिला.

शरद पवारांनी पत्नीसह थिएटरमध्ये जाऊन पाहिला 'सत्यशोधक' चित्रपट; म्हणाले....
महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय गाथा असलेला 'सत्यशोधक' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मिळत आहे. आता 'सत्यशोधक' हा चित्रपट कसा वाटला याबद्दल विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सपत्नीक यांनी 'सत्यशोधक' हा चित्रपट पाहिला. तसेच चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
'सत्यशोधक' चित्रपटाच्या अधिकृत फेसबूक पेजद्वारे शरद पवारांनी 'सत्यशोधक' चित्रपट पाहिल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी यासंदर्भात व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. शरद पवारांनी शालेय विद्यार्थ्यांना 'सत्यशोधक' चित्रपट दाखवण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. ते म्हणाले, 'अतिशय उत्तम चित्रपट आहे. महात्मा फुलेंचे जे आयुष्य आहे, त्यांचे आयुष्यातले महत्वाचे प्रसंग आहेत, ते वास्तव रूपाने या ठिकाणी लिहिले, मला स्वतःला असं वाटतं. महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये हा चित्रपट दाखवला पाहिजे.राज्य सरकारला ही विनंती'.
सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. 'सत्यशोधक' चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वीच घेतला. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सत्यशोधक चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी केली होती. महात्मा फुलेंचे विचार आणि कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी राज्य सरकारनेही चित्रपट टॅक्स फ्री केला आहे.
'सत्यशोधक' या चित्रपटात अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी महात्मा फुलेंची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री राजश्री देशपांडे या सावित्रीबाईंच्या भूमिकेत आहेत. गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भुमिका आहेत. तर 'सत्यशोधक' चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूर वाघ असून समता फिल्म्स प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित हा सिनेमा आहे.