"मला स्वप्न मराठीत पडतात..." नेमकं काय म्हणाले नाना पाटेकर, सचिन पिळगावकरांना टोला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 15:37 IST2025-11-26T15:11:00+5:302025-11-26T15:37:55+5:30
नाना पाटेकर आपल्या स्पष्ट वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात.

"मला स्वप्न मराठीत पडतात..." नेमकं काय म्हणाले नाना पाटेकर, सचिन पिळगावकरांना टोला?
Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आपल्या स्पष्ट वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच मंगळवारी (२५ नोव्हेंबर) छत्रपती संभाजीनगर येथे एमजीएम विद्यापीठात आयोजित सेंट्रल झोन युवा महोत्सव कार्यक्रमात त्यांनी रोखठोक भाषण केले आहे. याच कार्यक्रमातील नाना यांचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. ज्यामध्ये त्यांनी "मला स्वप्न मराठीत पडतात" असं विधान केलं. मात्र, यावेळी नानांनी हे विधान करत मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
नाना पाटेकर यांनी एमजीएम विद्यापीठात हिंदी भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यानंतर आपण सर्वांना (इतर राज्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांना) समजावं म्हणून हिंदीत संवाद साधल्याचं त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले, "मराठी मध्ये बोलताना शब्द शोधावे लागत नाहीत. ते सहज येतात, पटकन तोंडी येतात. कारण, मला स्वप्न ही मराठीमध्ये पडतात. ती माझी मातृभाषा आहे", असं ते म्हणाले. नाना पाटेकर यांनी हे विधान केले असले तरी, त्यांच्या बोलण्यात कुठेही सचिन पिळगावकर यांचा उल्लेख नाही.
काही महिन्यांपूर्वी सचिन पिळगावकर यांनी एका कार्यक्रमात उर्दू भाषेवर असलेले त्यांचे प्रेम व्यक्त करताना म्हटलं होतं की, "माझी मातृभाषा मराठी आहे पण मी विचार उर्दू भाषेतून करतो. मला जर माझी बायको किंवा इतर कोणीही रात्री ३ वाजता जरी उठवलं तरीही मी उर्दू भाषेतूनच बोलून जागा होतो. मी केवळ उर्दू भाषेतून जागा होत नाही, तर त्या भाषेत झोपतो ही. माझी उर्दू भाषा ही माझ्या बायकोला सवत म्हणून आवडते. माझं त्या भाषेवरील प्रेम माझ्या बायकोला आवडतं". सचिन पिळगावकर यांचे हे विधान प्रचंड व्हायरल झालं होतं. त्यावरून त्यांना काही जणांनी ट्रोल सुद्धा केलं होतं.