"ऑडिशन देत आहे...", मुक्ता बर्वेला करायचंय हिंदीत काम; प्रियाकडून घेतेय सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 10:48 IST2025-11-27T10:47:28+5:302025-11-27T10:48:24+5:30
मुक्ताला हिंदीतही सक्रीय होण्याची इच्छा आहे. याविषयी ती म्हणाली...

"ऑडिशन देत आहे...", मुक्ता बर्वेला करायचंय हिंदीत काम; प्रियाकडून घेतेय सल्ला
मुक्ता बर्वे मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या २० वर्षांपासून ती अभिनय करत असून आपल्या करिअरमध्ये तिने एकापेक्षा एक सिनेमे दिले आहेत. 'जोगवा', 'मुंबई पुणे मुंबई', 'एक डाव धोबीपछाड' हे तिचे काही सिनेमे. तर 'फायनल ड्राफ्ट','चारचौघी' या नाटकांमध्येही ती दिसली. शिवाय काही मराठी मालिकाही केल्या. आता मुक्ताला हिंदीतही सक्रीय होण्याची इच्छा आहे. याविषयी ती नुकतंच एका मुलाखतीत बोलली.
मुक्ता बर्वेचा 'असंभव' सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमात प्रिया बापटही आहे. प्रियाने मधल्या काळात अनेक हिंदी सिनेमे, वेब सीरिज केल्या. प्रियाविषयी बोलताना मुक्ताने आपणही हिंदीत प्रयत्न करत असल्याचं सांगितलं.'मित्र म्हणे लाईमलाईट'ला दिलेल्या मुलाखतीत मुक्ता बर्वे म्हणाली, "प्रिया वेगवेगळ्या माध्यमांमध्ये, भाषांमध्ये काम करुन आली. एक्सपोजर घेऊन आली. त्याविषयीही आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या. कारण मी तिला म्हणत होते की मीही आता हिंदीच्या ऑडिशन्स देत आहे. तर मी काय करायला पाहिजे, कसं अप्रोच करायला हवं त्याविषयी तिने मला अत्यंत छान मोकळेपणाने सांगितलं. मोकळेपणा हा आमच्यात बाँड आहेच."
तर 'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत मुक्ता म्हणाली, "मी आधी मराठीमध्ये खूप गुंतले होते. नंतर हिंदीत प्रयत्न सुरु केले. देवी शॉर्ट फिल्म केली. खूप चांगली भूमिका होती. पण त्यानंतर अचानक कोरोना आला. यामुळे आधीचं एक वर्ष आणि कोव्हिडची दोन वर्ष असा माझा मोठा ब्रेक झाला. सुदैवाने नंतर मला पुन्हा मराठीत चांगलं काम मिळत गेलं आणि मी पुन्हा मराठीतच व्यग्र झाले. पण आता मी हिंदीत प्रयत्न सुरु केले आहेत आणि मराठी-हिंदी दोन्हीकडे कामात समतोल साधणार आहे."
मुक्ता बर्वेने याआधी २०२० साली 'देवी' या हिंदी शॉर्टफिल्ममध्ये काम केलं होतं. यामध्ये काजोल, नेहा धुपिया, श्रुती हासन, नीना कुलकर्णी यांची भूमिका होती. सध्या मुक्ताला हिंदी ओटीटीमधून काही ऑफर्सही आल्या आहेत. त्यामुळे ती लवकरच हिंदीत दिसेल अशी शक्यता आहे.