"समोरच्या माणसाला त्रास…", ट्रोलर्सबद्दल स्पृहा जोशीची प्रतिक्रिया, म्हणाली- "कुठल्याही कमेंटला उत्तर दिलं की…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 16:40 IST2025-10-27T16:33:48+5:302025-10-27T16:40:31+5:30
ट्रोलर्सबद्दल स्पृहा जोशीची प्रतिक्रिया, म्हणाली-"कुठल्याही कमेंटला उत्तर दिलं की…"

"समोरच्या माणसाला त्रास…", ट्रोलर्सबद्दल स्पृहा जोशीची प्रतिक्रिया, म्हणाली- "कुठल्याही कमेंटला उत्तर दिलं की…"
Spruha Joshi: हल्ली सोशल मीडियावर कलाकारांच्या खासगी वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकदा बोललं जातं. त्यावर चर्चा होते आणि त्यामुळे कलाकारांना ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. बऱ्याचदा यावर अनेकजण मोकळेपणाने भाष्य करताना दिसतात. अशातच मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशीने एका मुलाखतीत सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि नकारात्मक कमेंट्स याबाबत आपलं मतं मांडलं आहे.
नुकतीच स्पृहा जोशीने बीबीसी मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला कलाकारांच्या सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल विचारण्यात आलं. त्यावर आपली प्रतिक्रिया देत अभिनेत्री म्हणाली,"ट्रोलिंग हे होत असतंच. मी अनेकदा याबद्दल बोलली आहे की, सोशल मिडिया हे दुधारी अस्त्र आहे. प्रत्येक गोष्टीला जशा दोन बाजू असतात तशा या नाण्याला आहेत. सोशल मिडिया हे पब्लिसिटीचं सगळ्यात सोपं माध्यम आहे. आम्ही ते हक्काने वापरतो. आमचे चित्रपट, नाटक प्रमोट करण्यासाठी तिथे आम्ही हक्काने आमचा हा ऑडियन्स वापरतो. चांगली-वाईट माणसं सगळीकडे भरली आहेत. सोशल मीडियावर तर असं आहे की, समोर येऊन कोणी एखाद्याबद्दल घाण बोलत नाही. एवढी हिंमत नसते. तिथे उत्तरदायित्व नसतं.कोणीही कुठल्या नावाने अकाउंट उघडू शकतं. कोणी समोरासमोर दिसत नाही. रिकामा वेळ असला, एखादी गोष्ट आवडली नाही तर करा कमेंट,असं लोक करतात."
यानंतर स्पृहा म्हणाली, "आपण काही लिहिलं तर त्याचा समोरच्या माणसाला त्रास होऊ शकतो, असा कोणीही विचार करत नाही. या मासिकतेने कित्येक लोक हे करतात. पण, या गोष्टींपासून पळणार कुठे?नाहीतर संन्यास घ्यावा लागेल. ते शक्य नाही. मी माझ्या परीने या गोष्टींकडे दुर्लक्ष करते. अनेकदा लक्ष वेधण्यासाठी काहीतरी लिहिलं जातं. कुठल्याही कमेंटला उत्तर दिलं की त्यावरून नवीन चर्चा सुरु होतात. अनेकदा क्लिकबेटमुळे देखील असं होतं. एखाद्या अभिनेत्याने, अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट जशीच्या तशी घेतली जाते. त्याला वेगळं कॅप्शन दिलं जातं. त्यावरुन जे वेगळं ट्रोलिंग चालू होतं. त्याची जबाबदारी कोणाची. तिथे कुठे मग त्या कलाकाराच्या मनाचा विचार केला जातो? लोकांना किती कंट्रोल करणार?"
मग ते चक्र सुरु होतं…
"हल्ली मोठ्या मुलाखती पाहाण्याचा लोकांमध्ये संयम नसतो. मग तेवढंच काय ते रील उचलायचं त्याच्या मागे-पुढे ती व्यक्ती काय बोलली याचा जराही विचार करायचा नाही. मग ते चक्र सुरु होतं. याचा अर्थ सोशल मिडिया वापरणारे सगळे लोक घाण आहेत असा अर्थ नाही. पण,जे लोक वाईट आहेत त्यांचं असं असतं की आपल्याला इथे कोण विचारणार आहे. मी जाऊन कोणाला विचारणार,बाबा तू माझ्याबद्दल असं का लिहिलंस असं मी नाही करु शकणार जर ते मी केलं तर मग मी माझं काम कधी करू. तितकी ऊर्जा माझ्याकडे नाही.त्यामुळे मी कुठल्याही निगेटिव्ह कमेंटला उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाही. मी मला जे वाटतं ते पोस्ट करते." असं स्पष्ट मत अभिनेत्रीने मुलाखतीत मांडलं.