"कास्टिंग झालं अन् शूटला जाणार इतक्यात...", सायली संजीवने सांगितला इंडस्ट्रीतील अनुभव, म्हणाली-"किती वाईट…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 17:04 IST2025-12-05T16:50:18+5:302025-12-05T17:04:42+5:30
मराठी चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.

"कास्टिंग झालं अन् शूटला जाणार इतक्यात...", सायली संजीवने सांगितला इंडस्ट्रीतील अनुभव, म्हणाली-"किती वाईट…"
Sayali Sanjeev Talk About Rejection: मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री सायली संजीव ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सायलीने आपल्या सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेरसिकांची मनं जिंकली आहेत. लवरकरच ती 'कैरी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान, दिलेल्या एका मुलाखतीत तिने अभिनय क्षेत्रातील तिच्या सुरूवातीच्या संघर्षकाळाबद्दल तसंच रिजेक्शनविषयी सांगितलं आहे.
अलिकडेच सायली संजीवने 'MahaMTB' सोबत संवाद साधला. यावेळी तिने इंडस्ट्रीतील संघर्षकाळावर भाष्य केलं. करिअरच्या सुरुवातीला एका मालिकेसाठी निवड झाल्यानंतर अचानक तिला रिजेक्ट करण्यात आलं होतं. त्याविषयी बोलताना सायली म्हणाली,"एक मालिका होती ज्यासाठी मी ऑडिशन दिली आणि त्या मालिकेत माझं कास्टिंग लॉक झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शूट करणार आणि इतक्यात त्यांनी सांगितलं की चॅनलने दुसऱ्या कोणाची तरी निवड केली. काहे दिया परदेसच्या आधी हे सगळं घडलं होतं. माझं असं झालं की हे किती वाईट आहे, माझ्याबरोबर असं का झालं. शिवाय मी खूप चिडले, कारण तेव्हा मुळात या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव नव्हता."
त्यानंतर पुढे अभिनेत्रीने म्हटलं, "खूप मुले-मुली या क्षेत्रात काम करायचंय म्हणून येतात. मला ऑडिशनसाठी बोलावलं म्हणून मी आले होते. आपण सहा महिने ऑडिशन देतोय मग त्याच्यानंतर गोष्टी घडल्या. मग आता उद्या य़ेऊ नको असं सांगितलं, ते नाही झालं म्हणून मला त्याचं फार वाईट वाटलं. त्यानंतर मी थेट गाडी पकडली आणि नाशिकला निघून गेले. ती मालिका सुरु झाली असावी पण नंतर त्या मालिकेचं काय झालं मला माहिती नाही."
'अशी' मिळाली काहे दिया परदेस मालिका...
पुढे काहे दिया परदेस मालिकेबद्दल बोलताना सायली म्हणाली, "त्यानंतर मला काहे दिया परदेससाठी फोन आला. सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि मी या मालिकेचा भाग झाले. तर ती मालिका दोन-तीन महिन्यात बंद झाली. पण, काहे दिया परदेस जवळपास दीड-दोन वर्ष चालली. मला असं वाटतं की ती मालिका खूप कमी काळासाठी ठरली. त्यावेळी या क्षेत्रात आल्या-आल्या मला तो धडा मिळाला. "