"मला घरात पार्ट्यांनी सुरुवात करायची नव्हती तर...", सई ताम्हणकरच्या 'त्या' निर्णयाचं तुम्हीही कराल कौतुक, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 16:54 IST2025-10-23T16:45:14+5:302025-10-23T16:54:55+5:30
"कोणतेही नकारात्मक विचार...", या कारणामुळे सई ताम्हणकर राहत्या घरी करते दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन

"मला घरात पार्ट्यांनी सुरुवात करायची नव्हती तर...", सई ताम्हणकरच्या 'त्या' निर्णयाचं तुम्हीही कराल कौतुक, म्हणाली...
Sai tamhankar: आनंद, प्रकाश आणि चैत्यन्यानं भरलेला सण म्हणजे दिवाळी. सध्या देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. तर मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार देखील आपल्या कामातून थोडा ब्रेक घेत दिवाळी साजरी करताना दिसत आहेत.प्रत्येकजण आपल्या पद्धतीने हा सण साजरा करत आहे. दरम्यान, अभिनेत्री सई ताम्हणकर गेली अनेक वर्ष दिवाळी अगदी पारंपरिक पद्धतीने साजरी करते. दरवर्षी सई तिच्या राहत्या घरी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करते. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने यामागे तिचे काय विचार आहेत याबद्दल भाष्य केलं आहे.
आता अभिनेत्रीने नुकतीच 'अमुक तमुक' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या घरी 'दिवाळी पहाट' नेमकी कशी साजरी होते याविषयी बोलताना ती म्हणाली, मी गेले दोन वर्ष घरी दिवाळी पहाट करते.नवीन घर घेतल्यानंतर मी ठरवलं की, मला पार्ट्यांनी नाही सुरुवात करायची, मला काहीतरी वेगळे व्हायब्रेशन्स या घरात पाहिजे आहेत. दिवाळी पहाटची संकल्पना आम्ही मित्र-मैत्रिणी जमलेलो असताना एकत्रित सगळ्यांच्या डोक्यात आली. त्यानंतर मी आणि माझा मित्र दिग्दर्शक-लेखक ज्ञानेश झोटिंग आम्ही दोघे मिळून या दिवाळी पहाटचं आयोजन
करतो.
यापुढे अभिनेत्रीने म्हटलं, "पहिल्यांदा जेव्हा दिवाळी पहाट घरी झाली, त्या क्षणाचा अनुभव मी शब्दात नाही सांगू शकत. त्या क्षणी मला काय वाटलेलं, हे माझ्या आजही लक्षात आहे आणि ते खूप खास होतं. यावर्षी तिसरं वर्ष असणार आहे. शास्त्रीय संगीत, फराळ, नाश्ता, चहा-कॉफी असा बेत असतो. सकाळी साडेसात वाजता सगळे नटूनथटून घरी येतात आणि आम्ही सगळे एका शास्त्रीय संगीत सकाळचा आस्वाद घेतो आणि दिवस अशा व्हायब्रेशनने सुरू होतो."
दरम्यान,या वर्षी सईने १९ ऑक्टोबरच्या दिवशी तिच्या घरी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या मुलाखतीमध्ये सईने असंही म्हटलं, की दिवाळी हा तिचा आवडता सण आहे. या सणाचं वर्णन करताना सईने म्हटलं, "दिवाळी असा सण आहे की, हवेतच एक फेस्टिव्ह वातावरण असतं, आनंदाचं वातावरण असतं. त्यावेळी कोणतेही नकारात्मक विचार प्रयत्न करुनही आपल्याला शिवत नाहीत. मला हा वेळ खूप आवडतो."
सई ताम्हणकर तिच्या चित्रपटांपेक्षा स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखली जाते. सई ताम्हणकरने 'गुलकंद', 'दुनियादारी', 'तू ही रे', 'वजनदार', 'क्लासमेट्स' आणि 'धुरळा' यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये तर 'मिमी', 'डब्बा कार्टेल','ग्राउंड झिरो', 'मानवत मर्डर्स' अशा हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तसेच अनेक कलाकारांबरोबर तिने स्क्रिन शेअर केली आहे.