"सुरुवातीला मी नकार दिला होता, कारण...", 'असं' जमलं पूजा सावंतचं लग्न; अभिनेत्रीने सांगितला किस्सा, म्हणाली-" जवळपास दीड वर्ष…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 16:23 IST2026-04-13T16:21:31+5:302026-04-13T16:23:12+5:30
पूजा सावंतचं लग्न कसं जमलं? चिपळूणमध्ये आहे सासर, अभिनेत्रीने पहिल्यांदाच सांगितली लव्हस्टोरी

"सुरुवातीला मी नकार दिला होता, कारण...", 'असं' जमलं पूजा सावंतचं लग्न; अभिनेत्रीने सांगितला किस्सा, म्हणाली-" जवळपास दीड वर्ष…"
Pooja Sawant: 'महाराष्ट्राची कलरफुल' अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी पूजा सावंत ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय नायिकांपैकी एक आहे. पूजा सावंतचा चाहतावर्ग कमालीचा मोठा आहे. दरम्यान, वैयक्तिक आयुष्यात पूजाने सिद्धेश सावंतसोबत फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीने जमलं आहे.लग्नानंतर पूजा काही काळ ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली आहे. सध्या पूजा सावंत सालबर्डी या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिचं लग्न तसंच तिचा नवरा काय काम करतो, या गोष्टींबद्दल सांगितलं आहे.
अलिकडेच 'आरपार- वुमन की बात'ला दिलेल्या मुलाखतीत पूजाने तिच्या लग्नासह बऱ्याच गोष्टींबद्दल खुलासा केला. यावेळी तिने सांगितलं,"आमचं अरेंज मॅरेज झालं. आई-वडिलांनीच ते स्थळ माझ्यासाठी शोधलं होतं. ते माझ्यासाठी स्थळ शोधतच होते कारण, त्यांच्या कळलं होतं की माझ्याकडून जोडीदार शोधणं वगैरे असं काही होणार नाही. त्यांना सिद्धेश फार आवडला होता. तेव्हा आई आणि माझ्या बहिणीने त्याचा फोटो पहिल्यांदा मला दाखवला."
यापुढे पूजा म्हणाली, "मला फोटो पाहून सिद्धेश आवडला. त्यावेळी माझं झालं ठीक आहे, एक फोन करायला काय हरकत आहे. मग मी त्याला पहिला फोन केल होता. त्या फोननंतर आम्ही एकमेकांना जाणून घेण्यासाठी आम्ही बराच वेळ घेतला. आम्ही जवळपास दीड वर्ष एकमेकांशी बोलत होतो. पण, त्यावेळी दोन्ही कुटुंबियांचा आमच्यावर दबाव नव्हता... लग्न करा वगैरे असं काही नव्हतं. आम्ही आमचा बराच वेळ घेतला आणि त्यानंतर लग्न केलं."
"आता सध्या तो ऑस्ट्रेलियात आहे. तो आधी भारतातच होता. ३-४ वर्षांपूर्वी त्याला चांगली संधी मिळाली आणि तो ऑस्ट्रेलियात गेला. आमचं बोलणं सुरु होतं तेव्हा तो ऑस्ट्रेलियात होता. सुरुवातीला मी नकार दिला होता. कारण, म्हटलं अरे, मला दुसऱ्या देशात स्थायिक होणं जमणार नाही. त्यामुळे माझा सुरुवातीला नकार होता. त्यानंतर मग तो म्हणाला, ठीक आहे आपण फक्त मित्र म्हणून बोलूयात. त्या मैत्रीचं मग नंतर प्रेमात रुपांतर झालं." असं पूजाने यावेळी सांगितलं.
पूजा सावंतचा नवरा काय करतो?
या मुलाखतीत पूजा सावंतने सांगितलं की, तिचा पती सिद्धेश सावंत हा मुळचा चिपळुणचा आहे. चिपळूणमधील कळंबुशी हे त्याचं गाव आहे. ऑस्ट्रेलियात तो फायनान्स बॅंकिंग क्षेत्रात कार्यरत आहे.