विजय पाटकर यांनी सांगितला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर पहिल्यांदा काम करण्याचा अनुभव, म्हणाले-"तो माणूस..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 15:10 IST2025-12-04T15:05:32+5:302025-12-04T15:10:48+5:30
"तीन दिवस त्यांच्याबरोबर...",विजय पाटकरांची 'बिग बीं' बाबत प्रतिक्रिया,'या'सिनेमात केलंय एकत्र काम

विजय पाटकर यांनी सांगितला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर पहिल्यांदा काम करण्याचा अनुभव, म्हणाले-"तो माणूस..."
Vijay Patkar: विनोदाचा बादशाह आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणून त्यांना ओळखले जाणारे अभिनेते विजय पाटकर हे मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेलं नाव आहे. मराठीबरोबर हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. विजय पाटकर यांनी ८० च्या दशकात त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.त्यांना आपल्या सिने कारकिर्दीत अनेक बड्या कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. विजय पाटकर यांनी एका हिंदी चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्या चित्रपटाचा किस्सा शेअर केला आहे.
विजय पाटकर यांनी साली प्रदर्शित झालेल्या बाबूल या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केलं होतं. या चित्रपटात त्यांच्याबरोबर सलमान खान, राणी मुखर्जी तसेच हेमा मालिनी, राजपाल यादव, स्मिता जयकर हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. अशातच 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विजय पाटकर यांनी बिग बींसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. त्यावेळी विजय पाटकर म्हणाले, "बाबूल नावाचा सिनेमा होता. मला रवी चोप्राजींनी बोलावलं. म्हणाले- विजय... दोन सीन आहेत करशील का? त्यावर उत्तर देत म्हणालो,' सर, मी तुम्हाला नाही कसं म्हणू शकतो. त्यांनी सांगितलं एक सीन अमिताभ बच्चन यांच्यासोबत आहे'. त्यांचे ते शब्द ऐकताच बच्चन साहेबांसोबत सीन असेल तर मी काहीही करायला तयार आहे."
विजय पाटकर पुढे म्हणाले, "त्या चित्रपटात एक सीन होता की सलमान, राणी मुखर्जी त्यामध्ये आहेत. त्यानंतर बच्चन साहेब जातात आणि मग मी जातो. तर तेव्हा अमिताभ यांना समोर पाहताच म्हटलं सर.. . 'तुमच्यासोबत काम करण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं...' तर ते म्हणाले- अच्छा माझंही स्वप्न पूर्ण झालं. त्याचं बोलणं ऐकून मी संभ्रमात पडलो. "
सगळ्यांच्या आधी ते सेटवर असायचे...
"तेव्हा सेटवर कमीत कमी दीड ते दोन तास लायटिंग चालू होतं. पण, तो माणूस सेटवर बसून होता. त्याकाळी काही स्मार्ट फोन नव्हते. खुर्चीत बसून ते हातात साध्या फोन घेऊन बसलेले. तिथे पाच-सहा मीटरच्या अंतरावर ते बसले होते आणि मी त्यांच्या मागे बसलो होतो. त्यावेळी मी फक्त बच्चन साहेबांना बघत होतो. त्यानंतर जवळपास १५-२० मिनिटांनी सगळे लोक आले. मी तीन दिवस त्यांच्याबरोबर काम केलं. त्या सीनला सगळेच म्हणजे सलमान, राणी मुखर्जी बच्चन साहेब शरद सक्सेना अवतारजी, राजपाल यादव, जॉन अब्राहम आणि हेमा मालिनी असे सगळे कलाकार होते.आपल्याकडे कसं असतं... अरे, त्याला येऊदे मग मी सेटवर जातो. पण, ते सगळ्यांच्या आधी सेटवर असायचे. ते फक्त ब्रेक असताना सेटवर नसायचे नाहीतर पूर्णवेळ सेटवर असायचे." असा किस्सा त्यांनी सांगितला.