"तो भूमिकेशी एकरुप झाला होता म्हणून...", संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर विजय पाटकर यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 15:26 IST2025-03-31T15:21:27+5:302025-03-31T15:26:16+5:30
मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) हा छावा चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

"तो भूमिकेशी एकरुप झाला होता म्हणून...", संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर विजय पाटकर यांची प्रतिक्रिया
Vijay Patkar: मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) हा छावा चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) चित्रपट २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, छावामध्ये अभिनेता संतोष जुवेकरने रायाजींची भूमिका साकारली. या चित्रपटाच्या यशानंतर संतोषने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने छावाचं शूटिंग करताना अक्षय खन्नाला औरंगजेब समजून त्याच्याशी संवाद साधला नसल्याचं वक्तव्य केलं. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या सगळ्या प्रकरणावर प्रसिद्ध मराठी अभिनेते विजय पाटकर (Vijay Patkar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेते विजय पाटकर यांनी 'तारांगण' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये संतोष जुवेकरच्या होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. त्यादरम्यान, अभिनेते म्हणाले, "संतोषच्या मनात तसं काही नव्हतं. संतोष एक नट म्हणून माणूस म्हणून कसा आहे हे मी ओळखतो. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून व्यक्त झाला. पण, हे सगळं लोकांनी फार वेगळ्या प्रकारे घेतलं. म्हणजे मी औरंगजेब साकारणाऱ्या अक्षय खन्नाकडे बघितलं नाही, असं म्हणाला. एवढा तो त्या भूमिकेमध्ये एकरुप झाला होता. कारण इनव्हॉल्ह होऊन काम करणारा तो नट आहे, तो खूप उत्तम नट आहे. पण, लोकं काय म्हणतील ते कशा प्रकारे घेतील यामुळे लोकांची तोंडं काय बंद करायची? त्यामुळे आपण कसं व्यक्त व्हायचं हे आपणंच ठरवायला पाहिजे."
पुढे विजय पाटकर म्हणाले, "कलाकारांनी बोलायचं नाही का, व्यक्त व्हायचं नाही का? आमच्या भावना जर खरोखर स्पष्ट असतील तर आम्ही बोलायचं नाही का? त्यावर तुम्ही लेबल लावणार का? नट म्हणून आम्ही सुद्धा लोकांवर प्रेम करुन काम करतो. आता हा आमचा व्यवसाय आहे. आमचं पोट भरण्याचं हे माध्यम आहे. पण, सारासार विचार केला पाहिजे. कलाकारांचा विचार करा ना. त्यांना सपोर्ट केला पाहिजे. आता मी देखील संतोषला सपोर्ट करतोय. कलाकार म्हणून त्याला सपोर्ट करणं हे माझं काम आहे." असं विजय पाटकर यांनी म्हटलं.