"संजय दादाच्या गटात मी नव्हतेच उलट सईने..." रिलेशनशिपच्या चर्चांवर तेजस्विनी स्पष्टच बोलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 15:49 IST2023-10-22T15:49:02+5:302023-10-22T15:49:59+5:30
मी त्याची ऑफस्क्रीन खूप चांगली...

"संजय दादाच्या गटात मी नव्हतेच उलट सईने..." रिलेशनशिपच्या चर्चांवर तेजस्विनी स्पष्टच बोलली
मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि दिग्दर्शक संजय जाधव यांच्या अफेअरच्या अफवा मध्यंतरी फार चर्चेत होत्या. तेजस्विनीने संजय जाधव यांच्यासोबत दोन सिनेमात काम केलं. तसंच ती त्यांच्या गटातील आहे आणि रिलेशनशिपमध्येही आहे असंही बोललं गेलं. या सर्व चर्चांवर तेजस्विनीने नुकतंच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट उत्तर दिलं आहे.
लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या कार्यक्रमात तेजस्विनी पंडितने मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी इंडस्ट्रीतील गटबाजी, रिलेशनशिप या सर्व चर्चांवर ती म्हणाली, "मी कधी कोणत्याच गटात नव्हते. लोक उगाच म्हणतात मी संजय जाधव यांच्या गटात होते. पण उलट माझ्यापेक्षा जास्त सईने संजयदादाच्या सिनेमात काम केलं आहे. मी त्याची ऑफस्क्रीन खूप चांगली मैत्रिण आहे. पण ऑनस्क्रीन मी त्याच्या फक्त 'तू ही रे' आणि 'ये रे ये रे पैसा' या दोनच सिनेमात काम केलं आहे. बाकी मी त्याच्याकडे चित्रपट केलेच नाहीयेत."
संजय जाधव यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती का?
तेजस्विनी म्हणाली, "मी संजय दादा ज्याला दादा म्हणते इथेच सगळं खरंतर आलं. उत्तर द्यायची गरज नाहीए. आपल्याला जेव्हा माहित असतं की समोरची व्यक्ती आपल्या बापारुपी किंवा दादारुपी आहे हे जर स्पष्ट आहे तर कोणाला उत्तरं द्यायची आणि का द्यायची?"
तेजस्विनीची ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.तेजस्विनी अभिनयाशिवाय ती निर्मिती क्षेत्रातही उतरली आहे. 'बांबू' हा तिचा पहिलाच निर्मित चित्रपट.तसंच 'अथांग' या थरारक वेबसिरीजचीही तिने निर्मिती केली आहे.