'आता पैशांचे बंडल हातात घ्यायचे दिवस...' अभिनेता संकेत कोर्लेकरची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 15:44 IST2023-10-24T15:42:17+5:302023-10-24T15:44:00+5:30
अभिनेत्याने दसऱ्याच्या मुहुर्तावर आईवडिलांचा फोटो पोस्ट करत एक खास पोस्ट शेअर केली आहे.

'आता पैशांचे बंडल हातात घ्यायचे दिवस...' अभिनेता संकेत कोर्लेकरची पोस्ट चर्चेत
मराठी अभिनेता संकेत कोर्लेकर (Sanket Korlekar) 'अजूनही बरसात आहे' मालिकेतून घराघरात पोहोचला. तर नुकत्याच रिलीज झालेल्या 'टकाटक' सिनेमातही त्याने काम केलं. आज दसऱ्याच्या मुहुर्तावर त्याने आईवडिलांचा फोटो पोस्ट करत एक खास पोस्ट शेअर केली आहे. आता पैशांचे बंडल हातात घ्यायचे दिवस असं म्हणत त्याने वडिलांच्या निवृत्तीवरुन भावूक पोस्ट लिहिली आहे.
संकेतचे वडील कंपनीत मेंटनन्स फिटर म्हणून काम करायचे. हे काम आपल्या मुलांनी करु नये असं त्यांना वाटायचं. म्हणून कष्टाने त्यांनी मुलांना शिकवलं. लवकरच ते निवृत्त होणार आहेत. कंपनीत आईवडील शस्त्रपूजन करतानाचा फोटो पोस्ट करत संकेतने लिहिले,'आयुष्यभर कंपनीत पाने आणि पक्कड हातात घेऊन मेंटनन्स फिटर म्हणून काम करून आम्हाला लहानाचे मोठे करणारे पप्पा त्यांच्या साठीमध्ये रिटायरमेंट च्या आधी कंपनीमध्ये शेवटचे शस्त्र पूजन करुन दसरा साजरा करताना.. पप्पा लहानपणी कायम म्हणायचे की आम्ही पाने पक्कड हातात घेतले तुम्ही नका घेऊ. पप्पा.. तुम्ही रिटायर होणार.. तयार राहा..आता पाने नाही, पैशांचे बंडल हातात घ्यायचे दिवस आलेत..शुभ दसरा..'
संकेतचा गेल्या महिन्यातच 'साऱ्या खुणा' हे गाणं रिलीज झालं.सध्या तो आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. त्याच्या कामाचं नेहमीच कौतुक झालं आहे.