"पुणेकरांचा लाडका मुरलीधर बोलत होता आणि अख्खा देश...", मित्राच्या 'त्या' भाषणानंतर प्रविण तरडेंची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:20 IST2025-04-03T15:19:56+5:302025-04-03T15:20:27+5:30
मुरधीधर मोहोळ यांनी राज्यसभेत ‘त्रिभुवन सहकार विद्यापीठा’चं विधेयक मांडलं. त्यांनी राज्यसभेत केलेल्या ४० मिनिटांच्या भाषणाची प्रचंड चर्चा रंगली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या या भाषणाचं प्रविण तरडे यांनादेखील कौतुक वाटत आहे.

"पुणेकरांचा लाडका मुरलीधर बोलत होता आणि अख्खा देश...", मित्राच्या 'त्या' भाषणानंतर प्रविण तरडेंची खास पोस्ट
भाजपाचे नेते आणि पुण्याचे महापौर राहिलेले मुरलीधर मोहोळ २०२४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडूण आले. त्यानंतर लगेचच त्यांनी मोदींच्या मंत्रिमंडळातदेखील वर्णी लागली. नुकतंच मुरधीधर मोहोळ यांनी राज्यसभेत ‘त्रिभुवन सहकार विद्यापीठा’चं विधेयक मांडलं. त्यांनी राज्यसभेत केलेल्या ४० मिनिटांच्या भाषणाची प्रचंड चर्चा रंगली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या या भाषणाचं प्रविण तरडे यांनादेखील कौतुक वाटत आहे.
मराठी अभिनेता, दिग्दर्शक प्रविण तरडेंनी त्यांच्या फेसबुकवरुन मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्यांनी मुरलीधर मोहोळ यांचं कौतुक केलं आहे.
प्रविण तरडेंची पोस्ट
माझा लाडका दोस्त आज देशाचा लाडका झाला.. देशाच्या सर्वोच्च सभागृहात आज तो बोलत होता तेव्हा त्याचा अख्खा प्रवास आठवला..
मुळशीच्या मुठा गावातील जिल्हा परीषदेची शाळा...शाळा सुटल्यावर स्वतःच्याच ऊसाच्या गुऱ्हाळात वडिलांना मदत...त्यानंतर मोठ्या कष्टाने कोल्हापूरमध्ये कुस्ती प्रशिक्षण... शिवाय कुस्ती शिकता शिकता कला शाखेची पदवी...
त्यानंतर भाजपा सारख्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षात राजकीय पार्श्वभूमी नसताना एक कार्यकर्ता म्हणून प्रवेश आणि मग तीस वर्षांचा एका कार्यकर्त्याचा प्रामाणिक संघर्ष आज दिल्लीत सोन्यासारखा चमकला...पुणेकरांचा लाडका मुरलीधर बोलत होता आणि अख्खा देश त्याला ऐकत होता. या भाषणानंतर मोठमोठ्या दिग्गजांनी त्याची पाठ थोपटली..मित्रा खुप मोठा झालायेस असाच होत राहशील.. कारण ही फक्त सुरुवात आहे.
याआधीही अनेकदा प्रविण तरडेंनी त्यांच्या लाडक्या मित्रासाठी पोस्ट शेअर केल्या होत्या. मुरलीधर मोहोळ खासदार झाल्यानंतरही प्रविण तरडेंनी खास पोस्ट लिहिली होती.