"चालत्या ट्रेनमधून एकाने ढकललं अन्...", मंजिरी ओकने सांगितला 'तो' भयावह प्रसंग, म्हणाली-"त्या धक्क्यातून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:03 IST2025-03-31T13:01:05+5:302025-03-31T13:03:39+5:30
सध्या मराठी मनोरंजनविश्वात 'सुशीला-सुजीत' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.

"चालत्या ट्रेनमधून एकाने ढकललं अन्...", मंजिरी ओकने सांगितला 'तो' भयावह प्रसंग, म्हणाली-"त्या धक्क्यातून..."
Manjiri Oak: सध्या मराठी मनोरंजनविश्वात 'सुशीला-सुजीत' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित हा चित्रपट येत्या १० एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा प्रसादसह पत्नी मंजिरी ओकने सांभाळली आहे. त्यामुळे हे कपल चर्चेत आलं आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसाद ओक (Prasad Oak) आणि मंजिरी ओक (Manjiri Oak) वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखतीत देताना दिसत आहेत. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मंजिरी ओकने तिच्या आयुष्यातील एका धक्कादायक प्रसंगाबद्दल भाष्य केलं आहे.
नुकतीच मंजिरी ओकने 'लोकशाही फ्रेंडली'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने संघर्षकाळावर भाष्य केलं. त्यावेळी ती म्हणाली, "एका मॅगझीनमध्ये माझा मार्केटिंगचा जॉब होता आणि तिकडे फिरतीवरचा तो जॉब होता. कोपरखैरणे, वाशी, सायन असं कुठेही जावं लागायचं. आता हे अंतर जवळ वाटतं पण, तेव्हा तिकडे जाण्यासाठी जवळजवळ तीन तास लागायचे. ही १९९८ सालची गोष्ट आहे आणि आम्ही बोरीवलीला राहायचो. तिकडून कुठेही कसंही जाऊन प्रवास करायला लागायचा."
त्यानंतर मंजिरी ओकने सांगितलं की, "त्यावेळी साधारण आठवा महिना माझा संपत आला होता आणि चालत्या ट्रेनमधून मला एकाने धक्का दिला. मुद्दामहून दिला चुकून लागला मला माहीत नाही पण, ट्रेन प्लॅटफॉर्मवर लागत होती त्याचा स्पीड कमी झाला होता. पण तो इतका जोरात मला धक्का बसला की मी ट्रेनच्या बाहेर पडले. तेव्हा मी पोटावर नाही पडले पण खाली पडले. मला त्या धक्क्यातून बाहेर यायला खूप दिवस लागले. तो माझ्या नोकरीचा शेवटचा दिवस होता. कारण मग घरी गेल्यानंतर प्रसादने मला खूप झापलं." असा भयावह प्रसंग मंजिरी ओकने सांगितला.