'..त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं आहे'; अभिनेता मंगेश देसाईच्या गाडीचा भीषण अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 15:30 IST2022-07-10T15:28:28+5:302022-07-10T15:30:11+5:30
Mangesh desai: अचानक ब्रेक लागल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतं. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

'..त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं आहे'; अभिनेता मंगेश देसाईच्या गाडीचा भीषण अपघात
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, निर्माता मंगेश देसाई (mangesh desai) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. मंगेश देसाई त्यांच्या कुटुंबासह कर्जतला जात असताना हा अपघात झाला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मंगेश देसाई त्यांच्या कुटुंबासह कर्जतला जात असताना वाशी येथील कोकण भवन येथे त्यांच्या कारचा अपघात झाला. मागून येणाऱ्या कारचालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे मंगेशच्या गाडीला धडक बसली. त्यामुळे हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात त्यांच्यासह घरातील कोणत्याही व्यक्तीला दुखापत झालेली नाही. मात्र, त्यांच्या कारचं प्रचंड नुकसान झालं आहे. तसंच, मागच्या कारमध्ये बसलेल्या चालकाच्या मित्राला किंचित दुखापत झाली असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नमस्कार, "माझ्या कारला अपघात झाला होता. पण,काळजी करण्याचं काहीच कारण नाही. मला कोणतीही दुखापत झालेली नाही. मी व्यवस्थित आहे. फक्त गाडीचं नुकसान झालं आहे. मागून ज्या गाडीने ठोकलं त्याच्या चालकाच्या मित्राला थोडी दुखापत झाली आहे. मात्र, त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेलं आहे. तो सुद्धा व्यवस्थित आहे त्यामुळे कोणीही काळजी करु नका", असं मंगेश म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे मी अजिबात घाबरणार नाही. धन्यवाद. मी,माझे कुटुंबीय, आणि मित्र मंडळी सगळे व्यवस्थित आहेत. मला भरपूर फोन आले त्यामुळे मी व्हिडीओ काढत मी सुखरुप असल्याचा मेसेज देत आहे."
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर या अपघाताची चर्चा होत आहे. मात्र, मंगेश यांच्यासह त्यांचे कुटुंबीय सुखरुप असल्याचं सांगण्यात येतं. मंगेश देसाई मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि निर्माता आहे. अलिकडेच त्याचा 'धर्मवीर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.