सैफ अली खानवरील हल्ल्यावर अभिनेते मकरंद अनासपुरेंची प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 13:28 IST2025-01-20T13:26:57+5:302025-01-20T13:28:09+5:30
मकरंद अनासपुरेंनी महाराष्ट्रातील एकूणच परिस्थितीवरही भाष्य केलं.

सैफ अली खानवरील हल्ल्यावर अभिनेते मकरंद अनासपुरेंची प्रतिक्रिया, म्हणाले...
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) त्याच्याच घरात घुसलेल्या एका अज्ञाताने हल्ला केला. त्याने सैफवर ६ वार केले. आरोपी चोरीच्या उद्देशानेच आला होता. तसंच सैफचा लहान मुलगा जेहला ओलीस ठेवून पैशांची मागणी करण्याचा त्याचा प्लॅन होता. कालच आरोपीला पोलिसांनी अटक केली. कडक सुरक्षाव्यवस्थेतही अभिनेत्याच्या घरातच हल्ला होतो म्हणल्यावर सामान्य जनता तरी कशी सुरक्षित असेल असाच प्रश्न पडतो. या घटनेनंतर सगळेच हादरले आहेत. मराठी अभिनेते मकरंद अनासपुरेंनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) काल पुण्यात होते. शेतीसंदर्भातील एका उपक्रमाला भेट देण्यासाठी आले. यानंतर त्यांनी माध्यमांशी बातचीत केली. सैफवरील हल्ल्याबाबतीतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की अभिनेताच काय कोणावरही हल्ला झाला, कोणालाही निर्घृणरित्या मारलं गेलं तरी ती निषेधार्हच बाब आहे. फार चांगलं बोलण्याची गरज नाही. जे दोषी आहेत त्यांना कडक शासन झाल्याशिवाय या प्रकाराला आळा बसणार नाही. उद्या कायद्याचा धाक उरला नाही तर अराजकतेच्या तोंडावर आपण जाऊ."
सध्या महाराष्ट्राच्या वातावरणावर ते म्हणाले, "मी सकारात्मक विचार करतो. देशात स्वच्छता ठेवण्यासाठी आधी तुम्ही आपल्याच आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवू शकता. लोकांशी विचारमंथन करू शकता यातूनच चांगलं काही घडेल असं मला वाटतं. जातीपातीचं विष समाजात पसरलं तर ते अत्यंत दुर्देवी असणार आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. तर आपण सकारात्मक होऊया हा महत्वाचा भाग आहे."