Laxmikant Berde : -आणि लेकाने लावला बाबांना फोन..., अभिनय बेर्डेचा हा भावुक VIDEO पाहून डोळे पाणावतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 15:28 IST2022-10-01T15:27:12+5:302022-10-01T15:28:04+5:30
Laxmikant Berde's Son actor Abhinay Berde video : लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याचा एक भावुक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही....

Laxmikant Berde : -आणि लेकाने लावला बाबांना फोन..., अभिनय बेर्डेचा हा भावुक VIDEO पाहून डोळे पाणावतील
रंगभूमी, मालिका, चित्रपट अशा सर्व माध्यमांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारणारा विनोदाचा बादशाह आणि रसिकांचा लाडका ‘लक्ष्या’ अर्थात दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे ( Laxmikant Berde) यांना विसरणं शक्य नाही. अशात लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे (Abhinay Berde) याचा एक भावुक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील.
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत लक्ष्मीकांत यांचाा मुलगा अभिनय याने काही वर्षांपूर्वी अभिनयक्षेत्रात पाऊल टाकलं. अभिनयने अलीकडे ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली. या शोचा एक प्रोमो रिलीज झाला आहे. हा प्रोमो समोर आला आणि या व्हिडीओनं सर्वांना भावुक केलं.
प्रोमोमध्ये अभिनय आपल्या वडिलांशी म्हणजेच दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी फोनवर बोलताना दिसतोय.
तो म्हणतो, ‘बाबा तुम्ही मला सांगायचात मला आठवतंय, भूमिका कुठलीही असो, हजार टेन्शन घेऊन आलेला प्रेक्षक आपलं नाटक बघून घरी जाताना खिशात नाटकाच्या तिकिटांबरोबर मन भरून लाफ्टर घेऊन गेला पाहिजे. पंच बोललेल्या वाक्यात नाही. तो न बोललेल्या दोन वाक्यांमधल्या टायमिंगवर असतो. अभिनय ते टायमिंग ओळख. अभिनय प्रेक्षकांचा झाला पाहिजे तरच प्रेक्षक अभिनयचे होतील. बाबा आज कळतंय तुमचं वाक्य... एक काळ होता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय अख्ख्या महाराष्ट्राने लक्षात ठेवला होता. बाबा एक वचन देतो. त्या लक्ष्मीकांत बेर्डेचा हा अभिनय महाराष्ट्र उद्याही लक्षात ठेवेल. आय लव्ह यू बाबा....
अभिनयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. रडायला आलं..., मोठा हो मित्रा.... अशी भावुक कमेंट एका चाहत्याने केली आहे. आम्ही लक्ष्मीकांत बेर्डे यांना कधीही विसरू शकणार नाही, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.
अभिनय बेर्डे लवकरच ‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात बिग बॉस फ्रेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश त्याची हिरोईन असणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तेजस्वी पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत काम करताना दिसणार आहे. येत्या 4 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.