अण्णा नाईकांचा नवा लूक पाहिलात का? माधव अभ्यंकरांच्या फोटोची होतीये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 17:26 IST2022-03-09T17:25:07+5:302022-03-09T17:26:35+5:30

Madhav abhyankar: 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या यशानंतर माधव अभ्यंकर लवकरच 'गुल्हर' या आगामी मराठी चित्रपटात झळकणार आहेत.

marathi actor Anna Naik aka madhav abhyankar new look viral | अण्णा नाईकांचा नवा लूक पाहिलात का? माधव अभ्यंकरांच्या फोटोची होतीये चर्चा

अण्णा नाईकांचा नवा लूक पाहिलात का? माधव अभ्यंकरांच्या फोटोची होतीये चर्चा

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले अभिनेते म्हणजे माधव अभ्यंकर. या मालिकेत त्यांनी अण्णा नाईक ही भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे नकारात्मक भूमिका साकारुनही त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. त्यामुळे आज त्यांचा स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण झाला आहे. माधव अभ्यंकर यांनी आजवर अनेक विविधांगी भूमिका साकारल्या. यामध्येच आता त्यांचा एक नवा लूक चर्चेत आला आहे. या नव्या लूकमध्ये  त्यांना पाहिल्यावर अनेक जण थक्क झाले आहेत.

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या यशानंतर माधव अभ्यंकर लवकरच 'गुल्हर' या आगामी मराठी चित्रपटात झळकणार आहेत. या चिपटातील त्यांचा लूक समोर आला. विशेष म्हणजे हा लूक पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माधव अभ्यंकर यांच्या फोटोमध्ये ते एका धनगराच्या रुपात दिसून येत आहेत. यात डोक्याला गुलाबी फेटा, पांढरा सदरा, धोतर, हातात घुंगरू लावलेली काठी, उजव्या हातात कडं, डाव्या खांद्यावर उपरणं, गळयात तावीज, झुपकेदार मिशा, पायात वहाणा आणि हळदीनं भरलेला मळवट अशा रुपात ते पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे  गुल्हर या चित्रटाची कथा एका ११ वर्षांच्या लहान मुलाभोवती फिरताना दिसते. यात माधव अभ्यंकर महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

दरम्यान, या चित्रपटात त्याच्यासोबत विनायक पोद्दार, रवी काळे, भार्गवी चिरमुले, सुरेश विश्वकर्मा, किशोर चौगुले, रुक्मिणी सुतार, शिवानी बावकर, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, मंजिरी यशवंत, गणेश कोकाटे, कपिल कदम, पुष्पा चौधरी, स्वप्निल लांडगे, रेश्मा फडतरे, सचिन माळवदे, देवेंद्र वायाळ अशी कलाकार मंडळी झळकणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन रमेश चौधरी करत आहेत.

Web Title: marathi actor Anna Naik aka madhav abhyankar new look viral