"मला सगळ्यांनी विरोध केला, पण...", 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' मध्ये सिद्धार्थच्या कास्टिंगविषयी महेश मांजरेकरचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 15:54 IST2025-11-04T15:48:19+5:302025-11-04T15:54:55+5:30
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' मध्ये सिद्धार्थ बोडकेच्या कास्टिंगविषयी महेश मांजरेकरचा मोठा खुलासा,काय म्हणाले?

"मला सगळ्यांनी विरोध केला, पण...", 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' मध्ये सिद्धार्थच्या कास्टिंगविषयी महेश मांजरेकरचा मोठा खुलासा
Mahesh Manjrekar: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा सगळीकडे बोलबाला पाहायला मिळतोय. ३१ ऑक्टोंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. दरम्यान, पुन्हा शिवाजीराजे भोसले दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. अभिनेता सिद्धार्थ बोडके सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. मात्र, या सिनेमासाठी त्याची निवड कशी झाली याबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी खुलासा केला आहे.
अलिकडेच 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकरांनी चित्रपटासंदर्भात भरभरुन गप्पा मारल्या. त्यावेळी सिद्धार्थच्या कास्टिंगला सुरुवातीला अनेकांनी विरोध केला होता, असं त्यांनी म्हटलं. त्यावेळी ते म्हणाले, "मी त्याला चित्रपटात घेतलं तेव्हा तो देवमाणूसमध्ये नव्हता. त्या भूमिकेत दुसरा कोणता तरी अभिनेता काम करत होता. सिद्धार्थ थिएटर करतो हे मला माहीत होतं. त्याचं पहिलं नाटक 'अनन्या' मी पाहिलं नव्हतं, पण लोकांनी एवढं कौतुक केलेलं, त्याला मी एकदा भेटलो तेव्हा वाटलं की तो या भूमिकेसाठी योग्य आहे.मी त्याला दृश्यम-२ मध्ये बघितलं होतं. त्याला पाहिल्यावरच मी म्हटलं होतं की, तू माझ्याकडे छत्रपती शिवाजी महाराज करतोयंस. तुला वजन कमी करावं लागेल, घोडेस्वारी शिकावी लागेल. तो चालेल म्हणाला."
महेश मांजरेकरांनी पुढे सांगितलं," यानंतर 'देवमाणूस'मध्ये जो अभिनेता काम करणार होता, त्याला काहीतरी अडचण आली आणि मग त्याच्या जागी सिद्धार्थला घेण्यात आलं. पण, मला त्यासाठी सगळ्यांनी विरोध केला. कोणीतरी नाववाला घे... मी म्हटलेलं की आपल्याकडे कोणीच नाववाला नाहीये.मला तोच योग्य वाटतोय. पण या चित्रपटासाठी त्याने भयंकर मेहनत घेतली आहे.आणि त्याने त्याचं काम चोख वाजवलं आहे."अशा भावना व्यक्त करत महेश मांजरेकरांनी सिद्धार्थ बोडकेच्या कास्टिंगविषयी खुलासा केला आहे.