"१२th फेल सिनेमात विक्रांत मेस्सीने अप्रतिम काम केलं, पण..."; महेश मांजरेकर स्पष्टच म्हणाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 16:05 IST2025-10-27T16:05:19+5:302025-10-27T16:05:46+5:30
महेश मांजरेकरांनी हिंदी - मराठी सिनेमांचं उदाहरण देऊन एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. काय म्हणाले?

"१२th फेल सिनेमात विक्रांत मेस्सीने अप्रतिम काम केलं, पण..."; महेश मांजरेकर स्पष्टच म्हणाले
महेश मांजरेकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने महेश मांजरेकर यांनी मराठी सिनेमा आणि कलाकारांबद्दल त्यांचं रोखठोक मत व्यक्त केलंय. मराठी अभिनेते हिंदी कलाकारांपेक्षा किती सरस आहेत, याचं महत्व त्यांनी सांगितलं आहे.
माझा कट्टाला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणतात, ''विक्रांत मेस्सीने आधीपण सिनेमे केलेत. १२th फेल हा सिनेमा चालला पण विक्रांत मेस्सीने असं समजू नये की, तो सिनेमा त्याच्यामुळे चालला. विक्रांत मेस्सीने अप्रतिम काम केलंय. पण त्यानंतर विक्रांतचा आता आलेला आँखो की गुस्ताखियाँ सिनेमा कोणीच पाहिला नाही. तो दोन आंधळ्यांचा सिनेमा होता पण तो कुणीच पाहिला नाही. त्यामुळे आता कंटेंट चालतोय ना.''
''कंगना राणौत या अभिनेत्रीला सर्वांनी नाकारलं होतं. ती आणि माधवन दोघेही रिटायरमेंटमध्ये टाकलेले लोक आहेत. पण त्यांचा तनू वेड्स मनूचा कंटेंट चालला. या सिनेमाच्या पार्ट २ ने जवळपास पावणेदोनशे कोटींचा व्यवयाय केला. बधाई हो नावाचा पिक्चर. हिरो कोण तर, गजराज राव आणि नीना गुप्ता. या सिनेमाने १६० कोटींचा व्यवसाय केला. हे ह्यांना का नाही समजत की, कंटेंट चालतो. हे घाबरुन साउथच्या एक-दोन अभिनेत्यांना घेतात. कारण हिंदी पिक्चर तिथे डब होतो ना. तिथले लोक हिंदी सिनेमे बघत नाहीत त्यामुळे हे डब करतात. पण तिकडच्या अभिनेत्याला तुम्ही बॉलिवूडमध्ये काम करायला दिलं तर ते बघत नाहीत. आमच्या अभिनेत्याला आम्ही आमच्या भाषेत अभिनय करताना बघू असं ते म्हणतात.''
''उद्या समजा चांगला मराठी पिक्चर बनला इथे तर तो तामिळ, तेलुगुमध्ये डब केला तरीही लोक बघतील. त्यांचा आक्षेप इकडच्या स्टारवर आहे. त्यांनाही चांगला कंटेंट बघायचा असतोच की. आज सचिन खेडेकरचा पिक्चर लखनऊमध्ये रिलीज झाला पाहिजे. आपल्याकडे खूप चांगले अभिनेते आहेत. भरत जाधवचा आता थांबायचं नाय पिक्चर पाहिला मी. म्हणजे भरत किती संवेदनशील नट आहे.''
''भलेभले जे हिंदीचे लोक इथे राज्य करतात त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने सरस अभिनेते आपल्याकडे येतात. पण प्रॉब्लेम आहे की, मध्यप्रदेशात भरत जाधव कोण, सचिन खेडेकर कोण हे त्यांना माहिती नाही. आपलं दुर्दैव आहे की, आपले कलाकार साउथमध्ये काम करतात. मग तिथले लोक ते सिनेमे बघतात आणि म्हणतात, सचिन खेडेकर छोट्या भूमि करतो. नाही ओ! कोणीतरी सचिनचं भूमिका नाटक बघावं. थोतरीत मारेन तो सगळ्यांच्या.''