'काय गॅरंटी की तो चांगलंच काम करेल?', ऑडिशन घेण्याविषयी महेश मांजरेकरांनी मांडलं स्पष्ट मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:15 IST2025-11-06T13:13:23+5:302025-11-06T13:15:07+5:30
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमात सिद्धार्थ बोडकेची ऑडिशन घेतलीच नव्हती..

'काय गॅरंटी की तो चांगलंच काम करेल?', ऑडिशन घेण्याविषयी महेश मांजरेकरांनी मांडलं स्पष्ट मत
दिग्दर्शक महेश मांजरेकर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा घेऊन आले आहेत. यावेळी त्यांनी सिनेमातून महाराष्ट्रातील सध्याच्या गंभीर परिस्थितीवर प्रकाश टाकला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था बघून महाराज अस्वस्थ होतात. पुढे शेतकऱ्यांचं दुःख नाहीसं करण्यासाठी शिवाजी महाराज कोणते उपाय करतात? पिळवणूक करणाऱ्या सावकारांना ते कसा धडा शिकवतात? याची कहाणी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमात बघायला मिळते. अभिनेता सिद्धार्थ बोडकेने शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. सिद्धार्थची ऑडिशन न घेताच मांजरेकरांनी त्याची निवड केली होती. ऑडिशन घ्यायला आवडत नसल्याचं ते एका मुलाखतीत म्हणाले होते.
लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले, "मी ऑडिशन घेत नाही. मला आयुष्यात ऑडिशन घ्यायला आवडतच नाही. घोडेबाजारात जाऊन घोडे घेतल्यासारखं ते असतं. तुम्हाला कलाकाराशी बोलून कळतं की तो बरा अभिनय करणारा असेल. तो ऑडिशन चांगली देईन पण तो ती भूमिका चांगलीच करेल याची गॅरंटी काय? म्हणून मी माझ्या instincts वर जातो. त्याच्याशी बोलल्यावर मला त्याच्यात आत्मविश्वास आहे का हे कळतं. माझ्यासाठी तेच महत्वाचं आहे. उद्या कोणी मला विचारलं की, 'मी हा रोल करु शकेन का?' मी आधी त्याला सांगतो तू घरी जा. कारण मला वाटून काहीच उपयोग नाही. तुला वाटणं गरजेचं आहे."
ते पुढे म्हणाले, "सिद्धार्थला मी कास्ट केलं तेव्हा अनेक लोकांनी मला 'का' असं विचारलं. मी म्हटलं की मला खात्री आहे की हा मुलगा चांगलंच करेल. त्याने खूप मेहनत घेतली. तो खूप प्रामाणिक आहे. वजन कमी केलं. त्याने आयुष्यात घोडेस्वारी केली नव्हती ते तो शिकला. सिद्धार्थ म्हटलं की शिवाजी महाराजांची भूमिका हे सर्वांच्या लक्षात राहावं हे मला हवं होतं."