महाराष्ट्रदिनी महेश मांजरेकर यांनी केली ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ सिनेमाची घोषणा, 'हा' अभिनेता साकारणार छत्रपती शिवराय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 09:39 IST2025-05-01T09:39:27+5:302025-05-01T09:39:55+5:30
महेश मांजरेकर यांनी आज महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ या नव्या सिनेमाची घोषणा केली. या सिनेमात मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे

महाराष्ट्रदिनी महेश मांजरेकर यांनी केली ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ सिनेमाची घोषणा, 'हा' अभिनेता साकारणार छत्रपती शिवराय
आज १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर महेश मांजरेकरांनी त्यांच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ असं या सिनेमाचं नाव आहे. नवीन कथा आणि नव्या कलाकारांसह महेश मांजरेकर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सिनेमात महेश मांजरेकरांनी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली होती. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ सिनेमात मात्र वेगळा अभिनेता शिवराय साकारताना दिसणार आहे.
हा अभिनेता साकारणार छत्रपती शिवरायांची भूमिका
या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची महत्त्वपूर्ण भूमिका अभिनेता सिद्धार्थ बोडके साकारणार आहे. सिद्धार्थने अलीकडील काळात मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली असून आता शिवरायांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी त्याला मिळाली आहे. चित्रपटात त्याच्यासोबत बालकलाकार त्रिशा ठोसरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे लेखन अंतिम टप्प्यात असून, चित्रीकरण लवकरच सुरू होईल. महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शन, कथा लेखन असलेल्या या चित्रपटाचे संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे.
तर चित्रपटाची निर्मिती राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध करत आहेत. चित्रपटाच्या आशयात नेमके कोणते सामाजिक वा राजकीय विषय हाताळले जाणार, हे सध्या गुप्त ठेवण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्रच या सिनेमाच्या कथेचा मध्यवर्ती केंद्रबिंदू असणार आहे. आजच्या महाराष्ट्रातील मूलभूत प्रश्नांवर चित्रपटात भाष्य करण्यात येणार आहे, जे प्रश्न गेल्या काही दशकांपासूनही अनुत्तरितच आहेत.
“हे माझ्या महाराष्ट्राचं भविष्य आहे. यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा... गाठ माझ्याशी आहे. या शिवगर्जनेच्या सोबतीने ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ या चित्रपटाचा उद्देश स्पष्ट होतो. हा केवळ ऐतिहासिक चरित्रपट न राहाता, आधुनिक महाराष्ट्राला त्याच्या मूळ विचारांकडे परत नेण्याचा प्रयत्न असून हा सिनेमा ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा गौरव करतानाच, आजच्या समाजातील निष्क्रियतेला जाबही विचारणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने महेश मांजरेकर पुन्हा एकदा एक संवेदनशील तरीही ठाम भूमिका घेत आहेत, की इतिहासातील आदर्श हे केवळ गौरवगाथा म्हणून सांगायचे नसतात, तर ते वर्तमानाला दिशा देण्यासाठी पुन्हा पुन्हा आठवावे लागतात.