"दिवसाला ७ शेतकरी जीव देतात" महेश मांजरेकरांनी आकडेवारी मांडत सरकारला सुनावले खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 15:38 IST2025-10-30T15:35:09+5:302025-10-30T15:38:28+5:30
महेश मांजरेकर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या गंभीर स्थितीवर भाष्य करत थेट सरकारला खडे बोल सुनावले.

"दिवसाला ७ शेतकरी जीव देतात" महेश मांजरेकरांनी आकडेवारी मांडत सरकारला सुनावले खडेबोल
मराठी सिनेइंडस्ट्रीतले लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर सध्या त्यांच्या आगामी सिनेमामुळं चर्चेत आहेत. त्यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती प्रखरपणे मांडणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं त्यांनी अनेक मुलाखती दिल्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या गंभीर स्थितीवर भाष्य करत थेट सरकारला खडे बोल सुनावले.
महेश मांजरेकर यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी मांडत चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटलं, "गेल्या दहा वर्षांत तब्बल एक लाख २५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांत ७६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. म्हणजे, कर्जापायी दिवसाला सरासरी ७ शेतकरी आपला जीव देत आहेत". तसेच मांजरेकर यांनी बड्या उद्योजकांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, "तर दुसऱ्या बाजूला बड्या व्यावसायिकांची पंधरा लाख कोटी रुपयांची कर्ज माफ केली जातात".
महेश मांजरेकर यांनी मुंबई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं, "खरं तर कित्येक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोदसुद्धा होत नसेल. ते महाराष्ट्राला, राज्यकर्त्यांना , समाजाला कळतही नसेल. महणूनच ते कळावं आणि वावं, यासाठी 'पुन्हा...' हा सिनेमा मी आणतोय, आपल्यासमोर जेवणाचे ताट आहे, त्यात एक आत्महत्या लपलेली असेल, हे सत्य लोकांसमोर आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांप्रती असलेली माझी स्वतःची जबाबदारी समजून मी हा सिनेमा लिहिलाय", असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान,महेश मांजरेकर यांनी हे गंभीर विषय मांडले असतानाच, राज्यात सध्याची परिस्थिती देखील अत्यंत बिकट आहे. झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये शेतपिके पाण्याखाली गेली असून शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नागपूर येथे मोठे आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुमारे दहा हजारांहून आंदोलक सहभागी झाले आहेत. आज सायंकाळी सात वाजता बच्चू कडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होणार आहे. या आंदोलनाच्या संपूर्ण कर्जमाफीसह २२ प्रमुख मागण्यांवर चर्चा होणार आहे.