आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 17:26 IST2025-11-07T17:25:14+5:302025-11-07T17:26:31+5:30
प्रेमात अधलं मधलं काही नसतं, जे असतं ते आरपार..! इथे पाहा ललित हृताचा रोमँटिक सिनेमा

आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
गेल्या दोन-तीन महिन्यात मराठी अनेक मराठी सिनेमांची जोरदार चर्चा झाली. त्यातील ३ सिनेमे तर एकाच दिवशी रिलीज झाले. 'दशावतार','बिन लग्नाची गोष्ट' आणि 'आरपार'. तीनही सिनेमांना प्रेक्षकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. 'बिन लग्नाची गोष्ट' काही दिवसांपूर्वी अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाला. तर आता ललित प्रभाकर-हृता दुर्गुळे यांचा 'आरपार'ही घरबसल्या पाहता येणार आहे.
ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे ही फ्रेश जोडी 'आरपार'या मराठी सिनेमात दिसली. त्यांची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक विशेषत: तरुणाई अक्षरश: वेडी झाली. प्रेम, विरह, सूड असा आजकालच्या तरुणांच्या जगातला विषय सिनेमात मांडण्यात आला. ललित प्रभाकरचा चार्मिंग लूक, कडक अभिनयाचं सर्वांनीच कौतुक केलं. तर हृताने त्याला तोडीस तोड साथ दिली. सौंदर्य, क्युटनेस आणि अप्रतिम अभिनय करत तिने सर्वांना प्रेमात पाडलं. अमर आणि प्राची या भूमिकेत दोघांनी स्वत:ला अगदी झोकून दिलं होतं. याचा अनुभव जर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन घेतला नसेल तर तुम्हाला आता घरीच सिनेमा पाहता येणार आहे. अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा आज रिलीज झाला आहे. ललित आणि हृताने सोशल मीडियावर ही माहिती शेअरही केली आहे.
'आरपार' सिनेमा १२ सप्टेंबर रोजी रिलीज झाला होता. विशेष म्हणजे याच दिवशी ललित आणि हृता दोघांचाही वाढदिवस होता. तब्बल ५ आठवडे सिनेमा थिएटरमध्ये होता. सिनेमाने एकूण १ कोटी ६४ लाखांची कमाई केली होती. ललित प्रभाकरने सिनेमाची सहनिर्मिती केली होती. सिनेमातील गाणीही खूप गाजली. गुलराज सिंगने सिनेमासाठी संगीत दिलं होतं.