गुजराती, दाक्षिणात्य प्रेक्षकही 'उत्तर'च्या प्रेमात! प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून क्षितिज पटवर्धन झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 14:33 IST2025-12-23T14:27:43+5:302025-12-23T14:33:10+5:30

'उत्तर' सिनेमाला भरभरून मिळत असलेलं प्रेम पाहून क्षितिज पटवर्धन यांनी खास पोस्ट लिहिली आहे.

Kshitij Patwardhan Marathi Movie Uttar Shared Post About Feedback He Is Receiving | Kedar Shinde Praised | गुजराती, दाक्षिणात्य प्रेक्षकही 'उत्तर'च्या प्रेमात! प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून क्षितिज पटवर्धन झाले भावुक

गुजराती, दाक्षिणात्य प्रेक्षकही 'उत्तर'च्या प्रेमात! प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून क्षितिज पटवर्धन झाले भावुक

मराठी विश्वातले लोकप्रिय लेखक क्षितिज पटवर्धन यांचा 'उत्तर' हा सिनेमा नुकताच १२ डिसेंबरला प्रदर्शित झाला. या सिनेमांमध्ये अभिनेता अभिनय बेर्डे, ऋता दुर्गुळे आणि अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्या मुख्य भूमिका आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचा 'धुरंदर' आणि हॉलिवूडचा 'अवतार ३' हे सिनेमा धुमाकूळ घालत असतानाही 'उत्तर' हा मराठी सिनेमा आपलं स्थान टिकवून आहे.  सिने-रसिक हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊनच बघण्यासाठी आपली पसंती दर्शवत आहेत. 'उत्तर' सिनेमाला भरभरून मिळत असलेलं प्रेम पाहून क्षितिज पटवर्धन यांनी खास पोस्ट लिहिली आहे.

क्षितिज पटवर्धन यांनी लिहलं,"प्रेक्षकांना माहीत असतं! काल एकाच दिवसात माहीम, वाशी, बोरिवली आणि ठाणे असा व्हिजिट्सचा मोठा पल्ला पार पाडला. अतिशय गरजेचा होता. दोन गोष्टींसाठी, एक म्हणजे वर्षनुवर्षं मेहनत करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यात गर्दीने वेढलं जाण्याचा क्षण किती सुखावणारा असतो, याची कल्पना होती ती पुन्हा आली. आणि दुसरं प्रेक्षक तुम्हाला भेटतात, तेव्हा त्यांच्यासाठी तो आयुष्यातला अविस्मरणीय क्षण असतो. 'असं हिंदीवाले नाही येत भेटायला! मराठीमध्ये तुम्हाला अजून आमची किंमत आहे!' असं म्हणून प्रेक्षकांनी अभिनयवर जसं भरभरून प्रेम केलं तो सोहळा होता!".

या चित्रपटाचे यश केवळ मराठी भाषिक प्रेक्षकांपुरते मर्यादित राहिलेले नाही. क्षितिज यांनी सांगितले की, "अवतारमुळे शोज कमी होऊनसुद्धा कलेक्शन चांगलंच वाढलं. कारण येणाऱ्या प्रेक्षकांनीच ते वाढवलं. अजून एक बाब म्हणजे, 'आम्ही साऊथ इंडियन! आम्ही गुजराती! आम्ही नॉर्थचे, तरी मराठी बघायला आलो!' अशी अनेक माणसं भेटली. मीरा भाईंदरवरून बोरिवलीला येणारे, घणसोली वरून वाशीला येणारे, पार्ल्यावरून माहीमला येणारे प्रेक्षक हीच ताकद नाही तर दुसरं काय आहे? आम्ही त्यांच्यासाठी भेटायला जायला नको का?".

नेहमीच मराठी चित्रपट निर्माते थिएटर मालकांवर नाराज असतात, मात्र क्षितिज यांनी यावेळी त्यांचे आभार मानले आहेत. क्षितिज यांनी लिहलं, "अजून एक महत्वाचं म्हणजे आपण कायम थिएटर मालक, डिस्ट्रिब्युशन आणि एक्सिबिशन यांना नावं ठेवतो. पण 'उत्तर'च्या निमित्ताने मला त्यांचे मनापासून आभार मानायचेत! त्यांनी व्यवसायाच्या प्रचंड मोठ्या संधीत चांगल्या चालत असलेल्या मराठी सिनेमाला भक्कम साथ दिली आहे, जिथे शक्य आहे तिथे शोज वाढवले आहेत आणि म्हणूनच हा वाढता प्रतिसाद आहे. सादिक चितळीकर सर यांच्याशी होणारा रोजचा संवाद खूप काही शिकवणारा आहे. आता सुट्ट्या सुरु झाल्यात आणि आमची तिसऱ्या आठवड्याची तयारी सुद्धा. जिथे शोज असतील, जसे असतील, ते भरण्याकडे, वाढण्याकडे आणि चालण्याकडे फोकस आहे".

केदार शिंदेंचा तो एक फोन...

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक केदार शिंदे यांनी 'उत्तर' सिनेमा पाहिल्यानंतर क्षितिज यांना फोन केला. केदार शिंदेंनी उच्चारलेले एक वाक्य क्षितिज यांच्यासाठी खूप मोलाचे ठरले. ते म्हणाले, "गर्दीत सिनेमा पाहिला क्षितिज, याचा अर्थ एकच— प्रेक्षकांना माहीत असतं!"


Web Title : गुजराती, दक्षिण भारतीय दर्शक भी 'उत्तर' के दीवाने; क्षितिज पटवर्धन हुए भावुक

Web Summary : क्षितिज पटवर्धन की 'उत्तर' मराठी दर्शकों के अलावा अन्य लोगों को भी पसंद आ रही है। बॉलीवुड और हॉलीवुड से प्रतिस्पर्धा के बावजूद, फिल्म टिकी हुई है, गुजराती और दक्षिण भारतीय समुदायों के दर्शकों को आकर्षित कर रही है। पटवर्धन ने जबरदस्त प्रतिक्रिया और थिएटर मालिकों के समर्थन के लिए आभार व्यक्त किया।

Web Title : Gujarati, South Indian audiences also love 'Uttar'; Kshitij Patwardhan emotional

Web Summary : Kshitij Patwardhan's 'Uttar' is gaining popularity beyond Marathi audiences. Despite competition from Bollywood and Hollywood, the film is holding its ground, drawing viewers from Gujarati and South Indian communities. Patwardhan expressed gratitude for the overwhelming response and support from theatre owners.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.