"श्वसनाचा त्रास होतोय...", मुंबईतील प्रदुषणाबाबत केतकीची पोस्ट, महापालिकेलाही केलं टॅग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 17:34 IST2023-11-04T17:34:15+5:302023-11-04T17:34:52+5:30
केतकीने तिच्या इन्स्टा स्टोरीमधून मुंबईच्या प्रदुषणाबद्दल भाष्य केलं आहे.

"श्वसनाचा त्रास होतोय...", मुंबईतील प्रदुषणाबाबत केतकीची पोस्ट, महापालिकेलाही केलं टॅग
केतकी माटेगावकर ही लोकप्रिय गायिका आहे. आपल्या सुमधूर आवाजाने केतकी प्रेक्षकांचं मनोरंजन करते. तिने गायलेली अनेक गाणी हिटही ठरली आहेत. केतकी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टची माहिती केतकी चाहत्यांना पोस्टद्वारे देत असते. अनेकदा केतकी समाजातील घटनांवरही भाष्य करताना दिसते. केतकीने मुंबईतील वाढत्या प्रदुषणाबाबत पोस्ट शेअर केली आहे.
केतकीने तिच्या इन्स्टा स्टोरीमधून मुंबईच्या प्रदुषणाबद्दल भाष्य केलं आहे. "वाढत्या प्रदुषणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. नागरिकांना धूळीचे कण, इन्फेक्शन आणि श्वसनाचा त्रास होत आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांनी काळजी घेणं गरजेचं आहे. कचरा पाण्याच्या ठिकाणी फेकला जात आहे. याची काळजी घेतली गेली पाहिजे. एक जबाबदार नागरिक म्हणून मी मुंबई महानगरपालिकेला विनंती करत आहे," असं केतकीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. केतकीने मुंबई महापालिकेलाही या स्टोरीमध्ये टॅग केलं आहे.
दरम्यान, मुंबई प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. हवेच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. वाहनांमुळे होणारे प्रदूषण, इमारतींच्या बांधकामांमुळे होणारे प्रदूषण यावर कसे नियंत्रण करता येईल, याचा अभ्यास करण्यात येणार आहे.