"माझ्यात काहीतरी खोट..." सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक'च्या अपयशावर केदार शिंदे यांचं भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 12:42 IST2025-08-03T12:25:39+5:302025-08-03T12:42:43+5:30
केदार शिंदेंनी सांगितलं सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' फ्लॉप होण्याचं कारण

"माझ्यात काहीतरी खोट..." सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक'च्या अपयशावर केदार शिंदे यांचं भाष्य
Kedar Shinde on Zapuk Zupuk Failure: 'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वाचा सूरज चव्हाण विजेता ठरला आहे. सूरज 'बिग बॉस'चा विजेता ठरल्यावर केदार शिंदे यांनी 'झापुक झुपूक' या सिनेमाची घोषणा केली. बारामतीमधील एका छोट्याशा गावातून आलेल्या सूरजने त्याच्या साधेपणाने सर्वांचंच मन जिंकून घेतलं. दिग्दर्शक केदार शिंदेंनी त्याला थेट सिनेमात हिरोची भूमिका साकारण्याची संधी दिली. पण या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही आणि हा सिनेमा फ्लॉप ठरला. अशातच आता यावर केदार शिंदे यांनी एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलंय.
'मुक्कामपोस्ट मनोरंजनला'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केदार शिंदे म्हणाले की, "मला वाटतं कदाचित माझ्या विचारांत काहीतरी खोट असेल. सिनेमा लोकांनी पाहिलाच नाही. त्यांना तो सूरज चव्हाण अभिनेता बघायचाच नसेल. त्यांनी ती गोष्ट नाकारली".
पुढे ते म्हणाले, "मूल जन्माला घातल्यानंतर दहा दिवसांनी समजतं की त्याचा मृत्यू झाला आहे. तेव्हा जे दु:ख होतं, तेच दु:ख आपल्या एखाद्या कलाकृतीचं अपयश एका दिग्दर्शकाला पाहून होतं. ते दहा दिवस अत्यंत त्रासदायक असतात. जर ते नसेल तर मग आपण सृजनशील कलावतं नाहीत आहोत. आपल्याला त्याचं दु:ख व्हायलाच पाहिजे. पण, मी असा विचार नाही करु शकत की प्रेक्षकांना अक्कल नाही. उलट ज्यांनी मला नाकारलं, त्यांच्याकडेच कदाचित जास्त अक्कल आहे. आता त्यांच्या मनात मी माझं स्थान कसं निर्माण करणार, याचेच मी प्रयत्न सुरू आहेत. ज्या चुका आधी केल्यात त्या पुन्हा होणार नाहीत, याची काळजी घेतो. कारण, यशाचा कोणताच फॉर्म्युला नाही".
दरम्यान, 'झापुक झुपूक' सिनेमामध्ये सूरज चव्हाणसह जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे अशी तगड्या कलाकारांची स्टारकास्ट होती. या चित्रपटासाठी प्रत्येक कलाकारानं प्रचंड मेहनत घेतली होती.