'कागर' फेम शुभंकर तावडे झळकणार या चित्रपटात, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 18:28 IST2019-11-18T18:28:19+5:302019-11-18T18:28:50+5:30
‘कागर’ फेम अभिनेता शुभंकर तावडे लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे.

'कागर' फेम शुभंकर तावडे झळकणार या चित्रपटात, जाणून घ्या याबद्दल
कुठल्याही दिग्दर्शकाला आपल्या चित्रपटाची निवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी व्हावी असं जरूर वाटत असतं.. सर्वांचीच ही इच्छा पूर्ण होत नसली तरी आरॉन या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक ओमकार शेट्टी यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे. जागतिक चित्रपटक्षेत्रात सर्वात मानाचा समजल्या जाणाऱ्या कान (Cannes) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ’आरॉन’ महाराष्ट्र शासनाकडून पाठवण्यात आली होती. फक्त कान चित्रपट महोत्सव नाही तर जगातील अनेक चित्रपट महोत्सव आरॉनने गाजवले.
आरॉन नंतर पुढे काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला असताना लेखक-दिग्दर्शक ओमकार शेट्टी एक अनोखी कथा घेऊन नवीन चित्रपट बनवत असल्याचं सूत्रांकडून समजते आहे. मात्र या चित्रपटाविषयी व त्याच्या नावाविषयी सध्या गोपनीयता बाळगण्यात आली आहे. याचे कारण काय हे सांगण्यास चित्रपटाच्या टीमने नकार दिला आहे.
‘कागर’ फेम अभिनेता शुभंकर तावडे याला मुख्य भूमिकेसाठी निवडण्यात आले आहे असे चित्रपटाचे निर्माते इम्रान अली आणि रियाझ बलूच यांनी सांगितले. वर्ल्ड-वाईड मोशन पिक्चर्स द्वारे या चित्रपटाची निर्मिती होत आहे. या चित्रपटात शुभंकर सोबत कोण अभिनेत्री काम करणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
शुभंकरने कागर चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एन्ट्री केली होती. त्याबद्दल त्याने सांगितलं होतं की, माझा कागर हा पहिलाच चित्रपट. मोठे बॅनर, स्टारकास्ट, तसेच स्क्रिप्ट नवी असल्याने मला माझी भूमिका आव्हानात्मक वाटत होती. त्यासाठी मी काही गोष्टी नव्याने शिकायचे ठरवले. गावांत जाऊन काही लोकांसोबत चर्चा केली.
तिथले प्रश्न, त्यांच्या चर्चा मी गावातच ऐकायचो. अंगणातील चर्चा तिथे स्वयंपाक घरातही व्हायच्या. त्यांची लाईफस्टाईलही मला आत्मसात करावी लागली होती.