"मुस्लिम आहेत म्हणून सगळे तसे नसतात...", पहलगाम हल्ल्यावर अलका कुबल यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 13:13 IST2025-05-02T13:12:56+5:302025-05-02T13:13:16+5:30
Alka Kubal : अभिनेत्री अलका कुबल यांनीदेखील एका मुलाखतीत पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

"मुस्लिम आहेत म्हणून सगळे तसे नसतात...", पहलगाम हल्ल्यावर अलका कुबल यांची प्रतिक्रिया
काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यावर राजकीय नेत्यांसोबत कलाकार मंडळीदेखील तीव्र निषेध व्यक्त करत आहेत. दरम्यान अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांनीदेखील एका मुलाखतीत पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जात-धर्मांवरुन तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा विरोध केला आहे.
अलका कुबल यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, ''समोरुन हल्ला झाला तर आपण गप्प बसून चालणार नाही. आपलं मोदी सरकार छान निर्णय घेतील, यावर विश्वास आहे. आपण जेवढं शिकतोय, सुशिक्षित होतोय, सुसंस्कारी होतोय, तेवढेच आपण जात आणि धर्म जास्त करायला लागलोय. हे करता कामा नये. तू कोणत्या जातीचा, आडनाव काय हे विचारणं हे माझ्या मनाला पटत नाही. आमच्या इंडस्ट्रीत आम्ही कोणालाच त्याचं आडनाव विचारत नाही. आम्ही नावावरुन हाक मारतो. ''
''तुम्ही काळानुसार बदलायला हवे...''
त्या पुढे म्हणाल्या की, ''पहलगाम हल्ल्यानंतर लोकांना वाचवणारेदेखील तिथले स्थानिक मुस्लिम होते. त्यामुळे सगळीच माणसे तशीच नसतात. मुस्लिम आहेत म्हणून सगळे तसे नसतात. त्यात चांगलेदेखील असतात. त्यातील २-४ जण तसे असतील तर बाकीच्या हजार लोकांनाही तसंच समजले जाते. हे सगळं तुम्ही काळानुसार बदलायला हवे. आपण एवढे वर्ष गुण्यागोविंदानं नांदतो आहे. हिंदू-मुस्लिम कोणताही जात धर्म असोत आपण कधी असं केलं नाही पण आता हे जास्त व्हायला लागलं आहे. हे कशाकरता होतंय, हे कळत नाही. लोकांची मतं आता माझी जात, माझा धर्म असं खूप होत चाललं आहे. प्रत्येकजण शक्ती प्रदर्शने करू लागली आहेत. ''