Jaggu Ani Juliet Marathi Movie : टसल वालं स्पेशल साँग! ‘जग्गू आणि जुलिएट’चं ‘तू बी अन् मी बी’ गाजतंय!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 18:46 IST2023-02-14T18:44:56+5:302023-02-14T18:46:56+5:30
Jaggu Ani Juliet Marathi Movie : ‘जग्गू आणि जुलिएट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीसही पडताना दिसत आहे. अशातच या चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित झालं आहे.

Jaggu Ani Juliet Marathi Movie : टसल वालं स्पेशल साँग! ‘जग्गू आणि जुलिएट’चं ‘तू बी अन् मी बी’ गाजतंय!!
पुनित बालन स्टुडिओज् निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला, आणि प्रेक्षकांच्या पसंतीसही पडताना दिसत आहे. अशातच या चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित झालं आहे. अजय-अतुल यांची म्युझिकल ट्रीट असलेल्या या चित्रपटातील सगळीच गाणी अगदी हटके आहेत. आता याच चित्रपटातील ‘तू बी अन् मी बी’ हे गाणं प्रदर्शित झालंय आणि विशेष म्हणजे हे गाणं बॉलिवूड फेम अरमान मलिक याच्या आवाजात आहे.
अरमान मलिक आणि शाल्मली खोलगडे यांनी गायलेलं ‘तू बी अन् मी बी’ हे गाणं सोशल मीडियावर काही क्षणातच व्हायरल झालंय. यातील अमेय-वैदेहीच्या भन्नाट डान्सचंही कौतुक होतंय. उत्तराखंडातल्या नयनरम्य ठिकाणी या गाण्याचं शूटिंग झाल्यानं हे गाणं बघायला अजूनच धमाल येते. तर गीतकार गुरू ठाकूर यांच्या शब्दांनी या गाण्याला चार चाँद लावले आहेत.
अमेय-वैदेहीसोबतच ऋषिकेश जोशी, उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी, समीर चौघुले, अविनाश नारकर, सुनिल अभ्यंकर, सविता मालपेकर, रेणूका दफ्तरदार, अभिज्ञा भावे, अंगद म्हसकर, जयवंत वाडकर, केयुरी शाह अशा जबरदस्त कलाकारांची फौज चित्रपटात दिसत आहे, त्यामुळे मल्टिस्टारर चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांना पुन्हा एकदा मिळणार आहे.
‘पुनीत बालन स्टुडिओज्’ने यापूर्वी निर्मिती केलेला सामाजिक विषयावरील ‘मुळशी पॅटर्न’च्या सुपरहिट यशानंतर आता ‘जग्गू आणि जुलिएट’च्या रूपात नवीकोरी रोमँटिक लव्हस्टोरी प्रदर्शित झाली आहे. पुनीत बालन स्टुडिओज् निर्मित, अजय-अतुल म्युझिकल आणि महेश लिमये यांच्या दिग्दर्शनाची आणि कॅमेऱ्याची जादू दाखवणारा ‘जग्गु आणि जुलिएट’ नक्की बघा!