इतक्या सगळ्या गोष्टी कशा लक्षात राहतात?, सचिन पिळगावकर म्हणाले, "माझी तल्लख बुद्धी, म्हणून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 11:24 IST2025-12-06T11:23:28+5:302025-12-06T11:24:28+5:30
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) बऱ्याचदा त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत त्यांच्या तल्लख स्मरणशक्तीबद्दल सांगितलं. त्यांनी केलेलं हे विधान चांगलचे चर्चेत आले आहे.

इतक्या सगळ्या गोष्टी कशा लक्षात राहतात?, सचिन पिळगावकर म्हणाले, "माझी तल्लख बुद्धी, म्हणून..."
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) सातत्याने चर्चेत येत असतात. बऱ्याचदा ते त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत त्यांच्या तल्लख स्मरणशक्तीबद्दल सांगितलं. त्यांनी केलेलं हे विधान चांगलचे चर्चेत आले आहे.
सचिन पिळगावकर यांनी नुकतीच 'रेडिओ सिटी मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यांना 'तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी कशा लक्षात राहतात?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या तल्लख स्मरणशक्तीबद्दल अत्यंत मनोरंजक आणि तितकाच भावनिक खुलासा केला. ते म्हणाले की, "काय आहे ना! मी त्याच्यासोबतचं जन्माला आलोय, असं म्हणू शकतो आपण. माझी बुद्धी खूप तल्लख आहे. ती फार चांगली गोष्ट आहे, असं नाही म्हणता येत. कारण, सगळ्याच गोष्टी लक्षात राहतात ना! त्यामुळे ना, मी खूप सहजपणे कोणालाही माफ करू शकतो, पण मी कधीच काहीच विसरू शकत नाही."
''त्याने त्रास पण खूप होतो...''
सचिन पिळगावकर पुढे म्हणाले की, "ती खूपच चांगली गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. कारण, त्याने त्रास पण खूप होतो. पण तसं बघायला गेलं तर त्याचे फायदेसुद्धा खूप आहेत. कारण, ह्या गोष्टी लक्षात राहणं आणि त्या वेळेवर डोक्यात येणं, ते फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे बऱ्याच क्षुल्लक गोष्टीदेखील लक्षात राहतात."
वर्कफ्रंट
सचिन पिळगावकर हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि गायक अशा तिन्ही भूमिका त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांनी 'अशी ही बनवाबनवी', 'नवरा माझा नवसाचा', 'गंमत जंमत', 'नादिया के पार', 'बालिका वधू', 'अखियो के झारोंखो से', 'शोले' यांसारख्या गाजलेल्या मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे.