"तिने मला अनफॉलो केलं होतं...", अमृता खानविलकरचा नवरा हिमांशु मल्होत्राने दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 12:27 IST2025-05-16T12:26:15+5:302025-05-16T12:27:45+5:30

हिमांशु आणि अमृताच्या लग्नाला १० वर्ष झाली आहेत.

himanshu malhotra reveals why wife amruta khanvilkar unfollowed him talks about her | "तिने मला अनफॉलो केलं होतं...", अमृता खानविलकरचा नवरा हिमांशु मल्होत्राने दिलं स्पष्टीकरण

"तिने मला अनफॉलो केलं होतं...", अमृता खानविलकरचा नवरा हिमांशु मल्होत्राने दिलं स्पष्टीकरण

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या बिंधास्त स्वभावामुळे ओळखली जाते. अमृताच्या नृत्याची तर कायमच स्तुती होते. २०१५ साली अमृताने अभिनेता हिमांशु मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. हिमांशु मल्होत्रा पंजाबी असून अनेक हिंदी सिनेमा, सीरिजमध्ये दिसला आहे. बराच काळ डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न केलं होतं. 'नच बलिए ७' या डान्स शोचेही ते विजेते होते. काही वर्षांपूर्वी अमृताने हिमांशूला अनफॉलो केल्याने खूप चर्चा झाली होती. आता हिमांशुनेच त्यामागचं कारण सांगितलं आहे.

हिमांशु मल्होत्रा आगामी 'केसरी वीर' सिनेमात दिसणार आहे. सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने फिल्मी बीटला दिलेल्या मुलाखतीत त्याला अमृताविषयी प्रश्न विचारण्यात आला. तिने त्याला ब्लॉक केलं होतं याचं कारण काय यावर तो म्हणाला, "तिने मला अनफॉलो केलं होतं. मी राजस्थानमध्ये शूटिंग करत होतो. तिला माझ्याशी बोलायचं होतं. आमच्यात एका गोष्टीवरुन वादावादी झाली. अमृता तशी रागीट आहे. तिने रागारागात मला अनफॉलो केलं.ती रागात असल्याने तेव्हा आमचं बोलणं झालं नाही. काही दिवसांनी मी घरी आलो आणि तिची समजूत काढली."

एकमेकांच्या करिअरबद्दल तो म्हणाला, "प्रत्येकाचं नशीब वेगळं आहे. प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. आम्ही २००४ साली भेटलो. तिचा प्रवास सुरु झाला. टीव्ही शो, सिनेमा या सगळ्यात ती झळकली. मराठी सिनेमांमध्ये ती दिसायला लागली. जेव्हा दोन लोक एकाच कुटुंबाचा भाग आहेत तेव्हा आपल्या जोडीदाराबद्दल कोणतीही ईर्ष्या वाटू नये. आमचा वेगवेगळा करिअर प्रवास आहे. वेगवेगळ्या निवडी आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. तसंही कधी यश मिळतं तर कधी अपयश. हा नशिबाचाच खेळ आहे. अमृताच्या आयुष्यात असा काळ होता जेव्हा तिच्याकडे काम नव्हतं. मी तिला जोगीजींना भेटायला सांगितलं आणि एका आठवड्यात तिला राजी मिळाला. नंतर मला धर्मा प्रोडक्शनचा 'शेरशाह' मिळाला. त्यामुळे हे सुरुच राहणार आहे. त्यापेक्षा आयुष्य जगायला शिकलं पाहिजे. ज्याच्यासोबत तुम्ही आयुष्य घालवताय त्याच्याबद्दल कशाची ईर्ष्या?"

Web Title: himanshu malhotra reveals why wife amruta khanvilkar unfollowed him talks about her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.